esakal | कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांना पायघड्या; मात्र कामगार चिंतेत, कारण
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane-harvest.jpg

कारखाना सुरू झाल्यानंतर केलेल्या कामातून उचल दिलेली रक्कम कापून घेतली जाते. या वर्षी कारखान्यांकडून करार व उचल देण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत चाळीस टक्के कामगारांचे करार झाले असून, त्यांना उचलपोटीचा पहिला हप्ता मिळाला आहे. मात्र उर्वरित ६० टक्के कामगार अजूनही कोरोनामुक्तीची वाट पाहत आहेत. 

कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांना पायघड्या; मात्र कामगार चिंतेत, कारण

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

नाशिक : (मालेगाव) साखर कारखान्यांची गळीत हंगाम सुरू करण्याची लगीनघाई सध्या सुरू आहे. मुबलक ऊस असतानाही या वर्षी कोरोनाचे मोठे संकट साखर उद्योगापुढे आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ऊसतोडणी कामगार चिंतेत असल्याने अनेकांची हंगामापोटीचा करार व उचल घेण्याचीही तयारी नाही. कोरोनामुळे कारखान्यांना ऊसतोडणी ठेकेदार व कामगारांपुढे पायघड्या घालण्याची वेळ आली आहे. 

कोरोनामुळे अनेकांची हंगामापोटीचा करार

ऑक्टोबरअखेर हंगाम सुरू करण्याचे काही कारखान्यांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास १५ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. यातील दीड ते दोन लाख कामगार गुजरातमध्ये ऊसतोडणीसाठी जातात. हे कामगारही सध्याच्या परिस्थितीत परराज्यात जाण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या तीन-चार महिने आधी संबंधित ठेकेदार, ऊसतोडणी कामगार यांच्याशी कारखाने आगामी गळीत हंगामाचा लेखी करार करतात. तसेच त्यांना हंगामापोटी उचल देण्याची पद्धत आहे. ही रक्कम एक ते दोन टप्प्यांत मिळाल्यानंतर हंगाम सुरू होताच कामगार कुटुंबीयांसह कारखानास्थळी पोचतात. कारखाना सुरू झाल्यानंतर केलेल्या कामातून उचल दिलेली रक्कम कापून घेतली जाते. या वर्षी कारखान्यांकडून करार व उचल देण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत चाळीस टक्के कामगारांचे करार झाले असून, त्यांना उचलपोटीचा पहिला हप्ता मिळाला आहे. मात्र उर्वरित ६० टक्के कामगार अजूनही कोरोनामुक्तीची वाट पाहत आहेत. 

कोरोनामुळे ऊसतोडणी कामगार चिंतेत

ऊसतोडणीचे काम करणाऱ्या कामगारांच्या समूहाला 'डोकी सेंटर' म्हणतात. हे कामगार फक्त तोडणी करतात. वाहतूक व्यवस्था कारखाना करते, असे कामगार पश्‍चिम महाराष्ट्र व गुजरातमध्ये जातात. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, असे कामगार महाराष्ट्रातच ऊसतोडणीला प्राधान्य देतात. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव साखर कारखान्यांचा गड असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हा भाग वगळता इतर ठिकाणी ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांचे करार बऱ्यापैकी होत आहेत. कारखान्यांना ऊसतोडणी कामगारांसाठी कोरोना संरक्षणाच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अनेक कामगार या वेळी लहान मुलांना गावीच ठेवून ऊसतोडणीसाठी जाण्याच्या विचारात आहेत. 

हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

अशी मिळत आहे उचल 

* सात ते आठ बैलगाड्यांचा समावेश असलेली टोळी- चार लाख 
* एक टायर बैलगाडी- ६० हजार 
* ट्रॅक्टर गाडी- ७५ हजार 

महाराष्ट्रातील साखर कारखाने- १९६ 
गेल्या वर्षी सुरू झालेले कारखाने- १४२ 
बंद असलेले कारखाने- ५४  

हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात

संपादन - किशोरी वाघ