SundaySpecial : चला नाशिककरांनो...उठा 'हे' करूया..सगळे मिळून नाशिक वाचवूया!

 01
01

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये आणि शहरातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था मात्र व्हेंटिलेटरवर, हा गंभीर विरोधाभास आहे. अशावेळी महापालिका व जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करून, नागरी व पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून काय काय करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. विषाणू संसर्गाच्या तांत्रिक भानगडीत न पडता, लॉकडाउन हा अंतिम उपाय नाही, हे लक्षात घेऊन खालीलप्रमाणे काही गोष्टी करणे शक्‍य आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयाचा कायापालट करणे आवश्यक...

कोविड-19 च्या निमित्ताने नाशिक महापालिकेला स्वत:ची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारण्याची आयती संधी मिळाली आहे. ती साधताना बिटको, झाकिर हुसेन या महापालिकेच्या रुग्णालयाचा कायापालट करायला हवा. सध्या महापालिकेचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल नाही. जे आहेत ते केवळ कोविड केअर सेंटर्स. तिथे रुग्णांची वरवरची काळजी घेतली जाते. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या इस्पितळांचा मोठा फायदा झाला. ती स्थिती नाशिकमध्ये नाही. तातडीने पावले उचलून मनपाची हॉस्पिटल्स सक्षम केली, तर जिल्हा सामान्य रुग्णालयावर असलेले परावलंबित्व कमी होईल. त्याशिवाय, महापालिकेच्या सर्व सहाही विभागात दवाखान्यांची साखळी तयार करायला हवी. मोजके अपवाद वगळता आधीचे दवाखाने सध्या नावालाच आहेत. प्राथमिक निदान व उपचार तिथे झाले, तर मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. 

प्रत्यक्ष निदान व उपचारासाठी मैदानात उतरविण्याची गरज

मालेगाव किंवा अन्य ठिकाणी केली तशी राज्याच्या अन्य भागातील डॉक्‍टरांची कुमक तातडीने मागविण्याची गरज आहे. विशेषत: राज्यभरातील वैद्यक महाविद्यालयांमधील तज्ज्ञ, तसेच शक्‍य झाल्यास निवासी डॉक्‍टर्सचा ताफा तातडीने नाशिक शहर, तसेच लगतचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी या तालुक्‍यांमध्ये प्रत्यक्ष निदान व उपचारासाठी मैदानात उतरविण्याची गरज आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि इगतपुरी तालुक्‍यातील धामणगावचे एसएमबीटी मेडिकल कॉलेजची मदत घ्यायला हवी. 

शासकीय महाविद्यालयाची नितांत गरज

मुंबईसह राज्याच्या बहुतेक भागात जिथे शासकीय वैद्यक महाविद्यालये आहेत त्या जिल्हा मुख्यालयांना निवासी डॉक्‍टरांची खूप मोठी मदत कोरोनाचा मुकाबला करताना झाली आहे. राज्याचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ जिथे आहे त्या नाशिकमध्ये मात्र शासकीय वैद्यक महाविद्यालय नाही. पदव्युत्तर वैद्यक शिक्षण संस्था मंजूर असली तरी मुळात एमबीबीएस शिक्षण देणाऱ्या शासकीय महाविद्यालयाची नितांत गरज या संकटाने अधोरेखित केली आहे. 

तर रुग्णांवर अधिक चांगले उपचार...

नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयावर आणखी मोठा ताण आहे तो मालेगाव शहर वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील रुग्णांच्या उपचाराचा. जिल्हा परिषदांची प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालये महापालिकेच्या तुलनेत बरी असली तरी ती पुरेशी नाहीत. कोरोना संसर्ग आणखी बरेच महिने राहील, असे गृहीत धरून प्रा. आ. केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण हाती घेतले तरच जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल व तिथे भरती होणाऱ्या रुग्णांवर अधिक चांगले उपचार होऊ शकतील. 

प्रभागाचा विचार लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज

नाशिक महापालिकेची यंत्रणा आता नगरसेवकांनी हातात घ्यायला हवी. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक नगरसेवक घरात बसून राहिले, फारतर आजूबाजूच्या चार-दोन कॉलनींपर्यंतच पोचले. चार-चार नगरसेवकांची प्रभागरचना शहरवासीयांच्या मुळावर उठली. एकूण प्रभागाचा विचार लोकप्रतिनिधींनी केलाच नाही. झालेच तर पहिल्या दोन लॉकडाउनच्या काळात अन्नदान, धान्यवाटप, गरजूंना मदत एवढ्यापुरतेच नगरसेवकांचे काम राहिले. परिणामी, मनपा यंत्रणा व लोकप्रतिनिधींची तोंडे एकमेकांच्या विरोधात दिसली.

थोडेबहुत झाले ते राजकारण व आरोप-प्रत्यारोप

आता आजी-माजी नगरसेवकांनी राजकारणाच्या बाहेर पडून लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक नेते सोबत नसल्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना जो त्रास झाला तो आधीच टाळता आला असता. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या हजारो लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे जीव वाचविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी वॉर्डावॉर्डांत, प्रभागाच्या पातळीवर स्थानिक डॉक्‍टर्स व युवक मंडळे व अन्य सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन कोरोना स्क्रीनिंग करायला हवे. लक्षणे दिसणारे किंवा न दिसणारे, कोरोना अनुषंगाने थोडीबहुत शंका असणारे रुग्ण शोधून त्यांना इम्युनिटी बूस्टर ठरतील, अशी आयसीएमआर व आरोग्य खात्याने शिफारस केलेली आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी औषधांचे वाटप अशा उपाययोजना करायला नगरसेवकांनी पुढे यायला हवे. 

शहर वाचविण्याची मोठी जबाबदारी

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्ह्यातील दोन्ही खासदार हेमंत गोडसे व डॉ. भारती पवार, तसेच शहराशी संबंधित चारही आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले व सरोज आहिरे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांची बैठक बोलवावी व आठ-दहा दिवसांत कोविड-19 साखळी तोडण्यासाठी व्यापक अभियान हाती घ्यावे. यासाठी मदत करू शकणाऱ्या सर्व सेवाभावी, सामाजिक संस्था व व्यक्‍तींची, सेवानिवृत्त अधिकारी व इतरांची मदत घ्यावी. हे पौराणिक, ऐतिहासिक शहर वाचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, याचे भान ठेवून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सगळे एकत्र आले तर हे अभियान यशस्वी होईल. या सगळ्या प्रवासात खासगी दवाखाने, डॉक्‍टर्सची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

एक अभियान म्हणून कामे हाती घेण्याची गरज...

वेगवेगळ्या कारणांनी सध्या डॉक्‍टर्स टीकेचे धनी होत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यापैकी मूठभर लोकांच्या कृती त्या टीकेसाठी कारणीभूत आहे. परंतु, आता निर्वाणीच्या व कसोटीच्या क्षणी ही टीका वगैरे सगळे बाजूला ठेवून डॉक्‍टरांना सोबत घेण्याची गरज आहे. हे खासगी डॉक्‍टर्स व दवाखाने म्हणजे कोरोनबाधितांवर उपचार करणारी मोठी हॉस्पिटल्स नव्हेत. अतिजोखमीच्या व अत्यवस्थ, गंभीर रुग्णांवर उपचाराचे काम त्यांना करू द्यावे. जे संसर्गाच्या चक्रात येऊ शकतात, अशा अन्य नागरिकांचा विचार करणे गरजेचे आहे व त्यासाठी आजी-माजी खासदार-आमदार, अन्य लोकप्रतिनिधी, नगरसेवकांनी अंग झटकून एक अभियान म्हणून ही कामे हाती घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com