कळवणमध्ये ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण

रविंद्र पगार
Thursday, 8 October 2020

आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मिणा, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या सूचनेनुसार कळवण शहरात ही मोहीम सुरु झाली.

नाशिक/कळवण : येथील नगरपंचायतीकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण होणार आहे. यात सुमारे २५ हजार नागरिकांची तपासणी होणार असून, गेल्या गुरुवारपासून कळवण शहरात मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत नगरपंचायत हद्दीतील तीन उपकेंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार असून, आरोग्य विभागाचे सात व नगरपंचायतीचे १५ अशा २२ कर्मचाऱ्यांवर मोहिमेची जबाबदारी नगरपंचायत व आरोग्य प्रशासनाने सोपवली आहे. 

आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मिणा, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या सूचनेनुसार कळवण शहरात ही मोहीम सुरु झाली. नगराध्यक्ष रोहिणी महाले, उपनगराध्यक्ष अनुराधा पगार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, आरोग्य सभापती अनिता जैन, नगरसेवक साहेबराव पगार, जितेंद्र पगार, गौरव पगार यांच्या उपस्थितीत डॉ. राजेश काटे, डॉ. सचिन पगार, आरोग्यसेवक बाजीराव सूर्यवंशी, श्रीकांत पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिरात नगरपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांची संयुक्त कार्यशाळा घेऊन मोहिमेला सुरवात केली. 
कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. यामध्ये थर्मलगनद्वारे तापमान तपासणे, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासणे, काही लक्षणे असल्यास ॲन्टिजेन टेस्ट, जास्त लक्षणे असल्यास स्वॅब टेस्ट अशा विविध तपासण्या होत असल्याची माहिती नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश काटे यांनी दिली. कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या नागरिकांची स्वॅब टेस्ट घेणार असून, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना अभोणा, मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविणार आहेत. त्यामुळे कळवणकरांनी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पटेल यांनी केले. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

आरोग्य आपल्या दारी मोहिमेला कळवण नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. 
- रोहिणी महाले, नगराध्यक्षा, कळवण 

नगरपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून महत्त्वपूर्ण सूचना देत आहेत. 
- सचिन पटेल, मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत 

मोहिमेकडे गांभीर्याने लक्ष देवून आपली तपासणी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करून घेणे गरजेचे आहे. 
- अनिता जैन, आरोग्य सभापती, कळवण

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survey of 5500 families under the My Family My Responsibility ampaign in Kalvan