कोरोना महामारीत शाळा सोडलेल्यांच्या ओळखीसाठी सर्वेक्षण; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सूचना 

महेंद्र महाजन
Monday, 11 January 2021

कोरोनाविरुद्धच्या त्रिसूत्रीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मास्क वापरणे, सहा फूट अंतर राखणे आणि हात सतत साबणाने धुणे यासाठीची सामग्री देण्यात आली आहे. त्याचा वापर करायचा आहे. शाळा बंद असताना मुलांना मदत म्हणून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर समुपदेशन, जनजागृती करावयाची आहे आणि त्यासाठी घरी भेट द्यायची आहे.

नाशिक : कोरोना महामारीमुळे शाळांमधून बाहेर पडलेल्या मुलांवर झालेला परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक राज्य तथा केंद्रशासित प्रदेशाने शाळांमधील गळती, कमी झालेली पटसंख्या, शैक्षणिक नुकसान, गेल्या काही वर्षांत सर्वसमावेशक प्रवेश, दर्जा आणि समानता पुरवताना आता त्यात होत असलेली अधोगती रोखण्यासाठी योग्य धोरण स्वीकारण्याची गरज पुढे आली आहे, याच पार्श्‍वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळा सोडलेल्या मुलांच्या ओळखीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

कोरोना महामारीत शाळा सोडलेल्यांच्या ओळखीसाठी सर्वेक्षण 
शाळेत जाणाऱ्या मुलांना दर्जेदार आणि समान शिक्षण उपलब्ध करून देणे आणि महामारीचा देशभरातील शालेय शिक्षणावरील परिणाम कमी व्हावा, यासाठी शाळा बंद असताना आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर कोणती पावले उचलावीत यासंबंधाने शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार शाळा सोडलेल्या मुलांसाठी स्वयंसेवक, स्थानिक शिक्षक आणि समुदाय सहभागातून अनिवासी प्रशिक्षण सुरू ठेवायचे आहे. तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी स्वयंसेवक, विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे घरी शिक्षण सुरू ठेवायचे आहे. मुलांची नावनोंदणी करणे आणि मुलांची शाळेतील उपस्थिती, यासाठी पालकांमध्ये आणि समाजात जागरूकता निर्माण करावयाची आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केल्यात मार्गदर्शक सूचना 
कोरोनाविरुद्धच्या त्रिसूत्रीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मास्क वापरणे, सहा फूट अंतर राखणे आणि हात सतत साबणाने धुणे यासाठीची सामग्री देण्यात आली आहे. त्याचा वापर करायचा आहे. शाळा बंद असताना मुलांना मदत म्हणून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर समुपदेशन, जनजागृती करावयाची आहे आणि त्यासाठी घरी भेट द्यायची आहे. समुपदेशन सेवा आणि मानसिक-सामाजिक सहाय्यासाठी मनोदर्पण वेब पोर्टलचा आणि दूरध्वनीवरून समुपदेशन यांचा वापर करायचा आहे. घरी शिक्षण देण्यासाठी, शैक्षणिक साहित्य आणि संसाधनांचे वाटप, पूरक दर्जाच्या साहित्याचा पुरवठा, प्रशिक्षण शिबिरे, कृती पुस्तिका दिली जाणार आहेत. शिवाय चाकावरची शाळा आणि गावस्तरावर लहान समूहांसाठी वर्ग या पर्यायांच्या शक्यतांची चाचपणी करायची आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

ऑनलाइन प्रशिक्षणाची लवकरच सुरवात

मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन-डिजिटल संसाधने, दूरदर्शन, रेडिओ यांचा उपयोग वाढवायचा आहे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षण मॉड्युल्सचा प्रभावी उपयोग आणि दिक्षा पोर्टलवर कोरोना प्रतिसादात्मक वर्तनासाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची लवकरच सुरवात केली जाणार आहे. ‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिकेचा वापर मुलांचा शिक्षणातील आनंददायी सहभागासाठी केला जाईल, असेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey for school dropouts in Corona pandemic nashik marathi news