पेट्रोलपंपावर दरोडा पडला महागात...नागरिकांच्या मारहाणीत दरोडेखोराचा मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

‘हवे ते घ्या, लूट करा, मात्र कुणालाही मारू नका व दुखापत करू नका’, अशी विनवणी करत गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज काढून दिला. मात्र, संशयितांचा आवेश पाहून सूर्यवंशी यांनी रस्त्यावर धाव घेत तेथून जात असलेल्या एका पिक-अपला हात दिला. त्यानंतर...

नाशिक / वणी : ‘हवे ते घ्या, लूट करा, मात्र कुणालाही मारू नका व दुखापत करू नका’, अशी विनवणी करत गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज काढून दिला. मात्र, संशयितांचा आवेश पाहून सूर्यवंशी यांनी रस्त्यावर धाव घेत तेथून जात असलेल्या एका पिक-अपला हात दिला. त्यानंतर...

काय घडले नेमके?
शनिवारी (ता. १८) रात्री साडेआठच्या सुमारास या पेट्रोलपंपावर दरोडा टाकून चौघांनी दोन लाखांचा ऐवज पळविला होता. या वेळी पंपमालकाने आरडाओरडा करताच नागरिकांनी तेजस सूर्यवंशी (रा. निरपूर, ता. बागलाण) व कृष्णा बडगुजर या दोघांना पकडले, तर दोघे पळून गेले. त्यापैकी रोहित घोडे (वय २३, रा. बंधारपाडा, ता. बागलाण) यास कळवण पोलिसांनी रविवारी दिंडोरी येथून, तर स्थानिक गुन्हे शाखेने सिद्ध पिंप्री येथून नारायण वारीस बर्डे यास अटक केली आहे. दरम्यान, जमावाच्या मारहाणीत तेजसचा मृत्यू झाला.

हवे ते घ्या, लूट करा, मात्र कुणालाही मारू नका
नांदुरी शिवारात शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून व कमरेला कोयते लावून आलेल्या या चौघांनी पंपाच्या केबिनच्या काचेवर कोयत्याने वार करीत आत जाण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्याने केबिनमध्ये बसलेले पंपाचे मालक किशोर सूर्यवंशी घाबरले. त्यांनी या चौघांना उद्देशून, ‘हवे ते घ्या, लूट करा, मात्र कुणालाही मारू नका व दुखापत करू नका’, अशी विनवणी करत गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज काढून दिला. मात्र, संशयितांचा आवेश पाहून सूर्यवंशी यांनी रस्त्यावर धाव घेत तेथून जात असलेल्या एका पिक-अपला हात दिला. आरडाओरडा ऐकताच परिसरातील काही नागरिकही धावून आले व त्यांनी दोघांना पकडले. मात्र, ऐवज घेऊन अन्य दोघे पळून गेले. पकडलेल्या दरोडेखोरांना जमावाने चांगलाच चोप दिला. या घटनेबाबत कळवण पोलिसांना कळविताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तेजसच्या मृत्यूप्रकरणी गणेश बग्गान याने दहा ते १५ ग्रामस्थांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तर, श्री. सूर्यवंशी यांनीही चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू

नांदुरी शिवारातील ओम साई पेट्रोलपंपावरील दरोड्याच्या प्रकरणात जमावाने पकडून मारहाण केलेल्या एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. एकाला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पळून गेलेल्या दोघांना पोलिसांनी रविवारी (ता. १९) दिंडोरी व सिद्ध पिंप्री येथून अटक केली.

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

पाच दिवसांत दुसरा दरोडा
वणी येथील पिंपळगाव रस्त्यावर तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपावर पाच दिवसांपूर्वी मंगळवारी (ता. १४) अशाच पद्धतीने दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी टाकलेल्या दरोड्यात पंपावरील दोघा कर्मचाऱ्यांकडील १६ हजार ५०० रुपये लुटले होते. त्यावेळी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद झाला होता. याच टोळीतील गणेश बग्गान वगळता अन्य तिघांचाही नांदुरी येथील दरोड्यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspect killed in petrol pump robbery nashik marathi news