स्वत:च्या निलंबनाबाबत ग्रामसेवकच अनभिज्ञ? अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा 

संतोष विंचू
Tuesday, 6 October 2020

सहा लाख ६१ हजारांच्या गैरप्रकारासंदर्भात येवल्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित करूनही डोंगरगावचे ग्रामसेवक आजही कामावर हजर आहेत. यामुळे प्रशासकीय पातळीवर नेमके काय सुरू आहे, हेच कळत नसून याची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

येवला (जि. नाशिक) : सहा लाख ६१ हजारांच्या गैरप्रकारासंदर्भात येवल्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित करूनही डोंगरगावचे ग्रामसेवक आजही कामावर हजर आहेत. यामुळे प्रशासकीय पातळीवर नेमके काय सुरू आहे, हेच कळत नसून याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रंजक महाराज ढोकळे यांनी केली. गैरप्रकार करणाऱ्यांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचाही इशाराही त्यांनी दिला. 

अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा 
ढोकळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर याआधीच ग्रामपंचायत अधिनियमाने येथील चार ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. त्यांचे अपीलही विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावले. त्याआधी डोंगरगावला कार्यरत ग्रामसेवकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे. ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमान्वये सरपंच उषा रोठे यांच्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली असून, याबाबत लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. मात्र, दरम्यानच्या काळात डोंगरगाव येथे रुजू झालेले व पूर्वीचीच निलंबनाची कार्यवाही सुरू असलेले ग्रामसेवक आजही कामावर हजर आहेत. एवढेच नव्हे, तर ते डोंगरगावचे ग्रामसेवक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोरील सुनावणीलाही हजर राहिले होते. सुनावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, विस्ताराधिकारी अहिरे उपस्थित होते. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
तक्रारदारांचे वकील एकनाथ ढोकळे यांनी सुनावणीदरम्यान ही बाब कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. मात्र आश्चर्य म्हणजे निलंबनाबाबत स्वतःलाच माहीत नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. हे गौडबंगाल म्हणजे गैरकारभाराचा कळस असून, निलंबन आदेशाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ॲड. ढोकळे यांनी केली. याशिवाय गैरप्रकारातील सर्वांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.  

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspended Gramsevak still present at work dongergaon nashik marathi news