सतरा हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले

प्रमोद सावंत
Tuesday, 29 September 2020

तक्रारदाराने तलाठी शेख यांच्याकडे जागेच्या सातबारा उताऱ्यावर ‘औद्योगिक वापर’ अशी नोंद करून उताऱ्याची मागणी केली होती. शेख यांनी टाळाटाळ करीत पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

नाशिक/मालेगाव : जागेच्या उताऱ्यावर ‘औद्योगिक वापर’ अशी नोंद करून सातबारा (७/१२) उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून १७ हजार २५० रुपयांची लाच घेताना नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर तलाठ्याला रंगेहाथ अटक केली.

पोलिस ठाण्याला लागूनच आहे तलाठी कार्यालय

तक्रारदाराने तलाठी शेख यांच्याकडे जागेच्या सातबारा उताऱ्यावर ‘औद्योगिक वापर’ अशी नोंद करून उताऱ्याची मागणी केली होती. शेख यांनी टाळाटाळ करीत पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.  विशेष म्हणजे किल्ला पोलिस ठाण्याच्या इमारतीला लागून असलेल्या शहर तलाठी कार्यालयातच मंगळवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लाचखोर तलाठी शरीफ गणी शेख (वय ४९) असे तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 

तलाठी कार्यालयानजीक सापळा लावून केली अटक

शहर तलाठ्याने पैशांची मागणी केले त्या वेळी तक्रारदारासमवेत एक साक्षीदारही होता. अखेर सातबारा उताऱ्यासाठी ठरलेली रक्कम मंगळवारी देण्याचे निश्‍चित झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने व अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण रासकर, मृदुला नाईक, हवालदार कुशारे, मोरे, गोसावी, पोलिस नाईक इंगळे, दाभोळे आदींच्या पथकाने तलाठी कार्यालयानजीक सापळा रचला. तक्रारदार रक्कम देत असताना या पथकाने तलाठी शेख यांना अटक केली. किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शेख यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.  

 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi arrested for taking bribe nashik marathi news