टीडीआर गैरव्यवहार : आजारपणाचे कारण देत शहा, मनवाणी सुनावणीला गैरहजर 

विक्रांत मते
Thursday, 26 November 2020

 विधानसभा उपाध्यक्षांपुढील सुनावणीला वकिलांनी आजारपणाचे कारण देत तारीख मागितल्याने पंधरा दिवस सुनावणी लांबणीवर पडली आहे. महापालिकेच्या चौकशी समितीसमोर येण्यास टाळाटाळ केली जात होती. आता शासन चौकशीसमोरही संबंधित विकसक येत नसल्याने अवमानाचा दावा दाखल होण्याची शक्यता आहे. ​

नाशिक : देवळाली शिवारातील वादग्रस्त सर्व्हे क्रमांक २९५ मधील टीडीआर घोटाळा प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांपुढील सुनावणीला वकिलांनी आजारपणाचे कारण देत तारीख मागितल्याने पंधरा दिवस सुनावणी लांबणीवर पडली आहे. महापालिकेच्या चौकशी समितीसमोर येण्यास टाळाटाळ केली जात होती. आता शासन चौकशीसमोरही संबंधित विकसक येत नसल्याने अवमानाचा दावा दाखल होण्याची शक्यता आहे. 

सुनावणीच्या गैरहजेरीमुळे अवमान दाव्याची शक्यता 

देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ या जागेवर शाळा, खेळाच्या मैदानांसाठी आरक्षण होते. जागा मोफत देण्याचे मूळ मालकांनी लेखी दिले असताना शहा बंधूंनी जागा घेऊन महापालिकेकडे ‘टीडीआर’ची मागणी केली होती. एकूण १५ हजार ६३० चौरसमीटर क्षेत्राचा ‘टीडीआर’ महापालिकेकडून घेताना सिन्नर फाटा येथे असलेली जागा नाशिक रोडच्या बिटको चौक ते पोलिस ठाण्याच्या बाजूने उड्डाणपुलापर्यंत दर्शविली होती. त्यामुळे मूळ जागेचा सरकारी भाव सहा हजार ९०० रुपये प्रतिचौरस मीटर असताना मोक्याची जागा दर्शवून २५ हजार १०० प्रतिचौरस मीटर भावाने ‘टीडीआर’ घेतला.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

आजारपणाचे कारण देत शहा, मनवाणी सुनावणीला गैरहजर 

यातून महापालिकेला शंभर कोटींपेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. यासंदर्भात ॲड. शिवाजी सहाणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तर शासनानेदेखील चौकशीचे आदेश दिल्याने समिती गठित करण्यात आली होती. शहा कुटुंबातील स्नेहल शहा यांना माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सूचनेवरून तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस पाठविल्यासंदर्भातील फाइल गहाळ झाल्याने समितीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी नव्याने समिती स्थापन केली. एकीकडे समितीची चौकशी सुरू असतानाच स्नेहल शहा, कन्हय्यालाल मनवाणी यांनी आजारी असल्याचे कारण देत हजर होण्यास टाळाटाळ केल्याने श्री. सहाणे यांनी शासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विधानसभेच्या उपासभापतींच्या दालनात बुधवारी (ता. २५) दुपारी दोनला सुनावणी झाली. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

चौकशीसमोर गैरहजर 
विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात टीडीआर घोटाळ्यासंदर्भात सुनावणी होती. परंतु विकसक विलास शहा यांनी ई-मेल पाठवून वकील आजारी असल्याचे कारण पुढे करताना पंधरा दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. सुनावणीसाठी महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे उपस्थित होते. 
 

महापालिकेकडून चौकशी होती, त्या वेळी विकासकांनी आजारी असल्याचे नाटक केले. आता शासनाच्या चौकशीसंदर्भातही आजाराचे कारण पुढे केले जात असल्याने यंत्रणेला फसविले जात आहे. 
- ॲड. शिवाजी सहाणे, तक्रारदार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TDR Scam Possibility of claim due to absence of hearing nashik marathi news