सर्पदंशाने जीव गमावल्याची रुखरुख...मिळाले ''हक्काचे'' घर...!

विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पेहरेवाडी या आदिवासी पाड्यावर कुडाच्या कच्च्या घरात राहणाऱ्या सविता खडके या विद्यार्थिनीची 2 ऑक्‍टोबर 2016 मध्ये राहत्या घरी रात्री ती झोपेत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या विद्यार्थिनीचा मृत्यू मुख्याध्यापक दाभाडे यांच्या मनाला चुटपूट लावून गेला. याबाबत इगतपुरी शिक्षक समितीचे नेते, मुख्याध्यापक हरिश्‍चंद्र दाभाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सततचा पाठपुरावा केला.

नाशिक : पेहरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सविता अमृता खडके या विद्यार्थिनीचा तीन वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याची रुखरुख लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक हरिश्‍चंद्र दाभाडे यांनी पाठपुरावा करून त्यांना शासनाची पाउण लाखांची मदत मिळवून दिली. त्यात स्वतःची पाउण लाखाची रक्कम घालून दीड लाखांतून या कुटंबाला हक्काचे पक्के घर बांधून दिले. कुडाच्या घराच्या जागेवर हक्काचे छत मिळाल्याने खडके कुटुंबीय आता निर्धास्त झाले आहे. विद्यार्थिनीच्या पालकांसाठी स्वतः तोशीष सहन करणाऱ्या दाभाडे यांचा हा उपक्रम सर्वच शिक्षक व पालकांसाठी विद्यार्थी, शाळा व शिक्षक यांच्यातील एक प्रेरणादायी प्रसंग म्हणून चर्चेत आहे. 

पेहरेवाडीतील हरिश्‍चंद्र दाभाडे यांचा मानवतावादी उपक्रम 

पेहरेवाडी या आदिवासी पाड्यावर कुडाच्या कच्च्या घरात राहणाऱ्या सविता खडके या विद्यार्थिनीची 2 ऑक्‍टोबर 2016 मध्ये राहत्या घरी रात्री ती झोपेत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या विद्यार्थिनीचा मृत्यू मुख्याध्यापक दाभाडे यांच्या मनाला चुटपूट लावून गेला. याबाबत इगतपुरी शिक्षक समितीचे नेते, मुख्याध्यापक हरिश्‍चंद्र दाभाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सततचा पाठपुरावा केला. त्यातून त्यांनी विद्यार्थिनीच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेची 75 हजारांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑगस्ट 2018 मध्ये मिळवून दिली. हे 75 हजार रुपये प्राप्त झाल्यावर पालक पुन्हा होते त्याच स्थितीतच राहतील, अशी चिंता त्यांना होती. पक्के घर नसल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली, याची रुखरुख त्यांच्या मनाला सतत लागून होती. त्यामुळे त्यांनी यावर न थांबता त्यांनी संकल्प केला, की पालकांचे कुडा-मातीचे कच्चे घराऐवजी त्या पालकांना पक्के घर मिळावे, त्यासाठी दाभाडे यांनी पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःचे 75 हजार व पालकांचे अपघात विमा योजनेचे 75 हजार रुपये अशा दीड लाखांत टुमदार घर बांधून दिले. त्यातून त्यांनी आपल्या परीने सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या कामात मित्रमंडळींनीही सहकार्य केले. 

हेही वाचा > मुलीचा विरह सहन होईना! व्याकूळ मातेचे अखेर टोकाचे पाऊल..

घराच्या रूपाने मृत मुलीच्या आठवणी

सतत दोन वर्ष शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा करून पालकांना पैसे मिळवून दिले. ते वाया जाऊ नये म्हणून त्या पालकांना घर बांधून दिले. घराच्या रूपाने मृत मुलीच्या आठवणी कायम जाग्या राहतील. - हरिश्‍चंद्र दाभाडे, मुख्याध्यापक, पेहरेवाडी  

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher built a house for the parents of the died student Nashik Marathi News