कारवाईचा बडगा उगारताच शिक्षकांची सर्वेक्षणाची तयारी; ६३५ शिक्षक होणार सहभागी

विक्रांत मते
Tuesday, 29 September 2020

शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्याचा फतवा काढताच सर्वच शिक्षकांनी सर्वेक्षणाची तयारी दर्शविली आहे. या मोहिमेत ६३५ शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

नाशिक : शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्याचा फतवा काढताच सर्वच शिक्षकांनी सर्वेक्षणाची तयारी दर्शविली आहे. या मोहिमेत ६३५ शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबरोबरच दिवसभर घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. 

ऑनलाइन शिक्षणासोबतच उपक्रमाची जबाबदारी 
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने घरोघरी कोमॉर्बिड आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये राबविली. या मोहिमेत गंभीर आजारांचे रुग्ण शोधताना शिक्षकांची दमछाक झाली. तब्बल चौदा लाख लोकांपर्यंत शिक्षक पोचले. त्यातून कॉमॉर्बिड रुग्ण शोधल्यानंतर महापालिकेतर्फे त्यांचे समुपदेशन करण्यास सुरवात झाली असतानाच शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हा उपक्रम अमलात आणण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी शिक्षकांचा समावेश करण्यात आला. परंतु शंभरहून अधिक शिक्षकांनी शासनाच्या उपक्रमात सहभागी होण्यास नकार दिल्याने आयुक्त जाधव यांनी ही बाब गंभीरपणे घेत जे शिक्षक सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होणार नाहीत, त्यांना नोटीस बजावण्याचे फर्मान काढल्यानंतर कारवाईच्या भीतीने शिक्षकांनी कामास होकार दिला. सर्वेक्षणाचे काम करत असतानाच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची जबाबदारीही शिक्षकांना पार पाडावी लागणार आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तपासणी 
कोमॉर्बिड आजाराचे रुग्ण शोधताना ३९ शिक्षकांनी व्याधींसह विविध कारणे देत कामातून सुटका करून घेतली होती. परंतु त्या शिक्षकांनादेखील आता सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. ज्या शिक्षकांचे वय पन्नासपेक्षा अधिक आहे, त्या ५६ शिक्षकांना वगळण्यात येणार आहे. जे शिक्षक नकार देतील, त्यांना जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर उभे करून तपासणी केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher survey preparation nashik marathi news