नऊ महिन्यांपासून वेतन मिळेना! राज्यातील शिक्षक साजरी करणार 'काळी दिवाळी'

अरुण मलाणी
Wednesday, 14 October 2020

तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक स्तरावर अनुक्रमे सहा हजार, आठ हजार आणि नऊ हजार इतके तुटपुंजे वेतन मिळते. सध्या तेही प्राप्त न झाल्याने राज्यातील हजारो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील संपूर्ण बाधित शिक्षक 'काळी दिवाळी' साजरी करणार असल्‍याचे अखिल महाराष्ट्रीय डीटीएड, बीएड स्टुडन्ट असोसिएशन संघटनेतर्फे कळविले आहे. 

कर्ज काढून उदरनिर्वाह

तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक स्तरावर अनुक्रमे सहा हजार, आठ हजार आणि नऊ हजार इतके तुटपुंजे वेतन मिळते. सध्या तेही प्राप्त न झाल्याने राज्यातील हजारो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्‍या तरी शिक्षण सुरू आहे. कोरोना ड्युटी, कोरोना सर्वेक्षण, ऑनलाईन अध्यापन आणि परीक्षा शिक्षक पार पाडत आहेत. अशावेळी वेतन न मिळाल्याने अनेक शिक्षक कर्ज काढून उदरनिर्वाह करत आहेत. कोरोनाचे कारण देऊन वेतन थांबविता येणार नसल्‍याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतांना, राज्य शासन या विषयाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

काळी दिवाळी साजरी केली जाणार

गेल्‍या एक ऑक्‍टोबरला शिक्षण आयुक्तांनी आपल्या कनिष्ठ अधिकार्यांच्‍या नावाने आदेश काढून शिक्षकांचे वेतन ऑफलाईन करण्याची सूचना देऊन पंधरा दिवस उलटले असतांना, कुठलीही कार्यवाही झाली नाही. राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीमार्फत होते. त्यासाठी नवनियुक्त शिक्षकांना शिक्षण संचालक कार्यालयाकडून 'शालार्थ आयडी' मंजूर झाल्‍यानंतर 'शालार्थ ड्राफ्ट' विभागीय उपसंचालक कार्यालय यांच्याकडून तयार होऊन तो त्या-त्या जिल्ह्याच्या 'वेतन अधीक्षक' यांच्याकडे जात असतो. परंतु सध्या दोन्हीही प्रक्रिया अर्धवट राहिल्याने गेली नऊ महिने शिक्षकांना वेतन प्राप्त होऊ शकले नाही. यातून काळी दिवाळी साजरी केली जाणार असल्‍याचे अखिल महाराष्ट्रीय डी.एड. बीएड. स्‍टुडंट असोसिएशनतर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers have not been paid for nine months nashik marathi news