ग्रामीण विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण; केबल चालकांच्या मदतीने घरोघर ज्ञानगंगा 

विनोद बेदरकर
Monday, 5 October 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्याच्या मदतीने ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट,मोबाईल संच पुरवण्यात येत आहेत. मोहिमेच्या पुढील टप्प्यात दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम आहे. 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्याच्या मदतीने ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट, मोबाईल संच पुरवण्यात येत आहेत. मोहिमेच्या पुढील टप्प्यात दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम आहे. 

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील केबलचालकांनी उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषदेने केलेला अभ्यासक्रम व मल्टीमीडिया कन्टेन्ट केबल चालकांच्या समन्वयातून दूरचित्रवाणीद्वारे २४ तास वाहिनी करून पोहोचवण्याचे ठरले. पहिली ते आठवतील मुलांचा विचार करून त्यांना दूरचित्रवाणीद्वारे अभ्यासक्रमातील कोणता घटक प्रामुख्याने शिकविला जावा जिल्हा परिषदेच्या स्तरावर शिक्षण विभागाची समिती निर्णय घेईल. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

जिल्हाधिकाऱ्यांकडून टॅबलेट 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांच्या अस्मिता या मुलीच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे 3 टॅबलेट आणि 9 पेन ड्राईव्ह सुपूर्द केले. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडियाद्वारे शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षकांचा वापर करावा. विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळेत अभ्यास वर्गासाठी उपस्थित राहता आले नाही तर त्यासाठी युट्युब वर अपलोड करून कायमस्वरूपी बघण्याची व्यवस्था करण्यात यावी. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक) 

उपक्रमासाठी सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिली जाईल. जिल्ह्यातील शिक्षकांनी यापूर्वी जे चलतचित्र बनविले आहे. त्याचाही वापर करण्यात येणार आहे. केबलचालकांच्या समन्वयातून उपक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. 
- लीना बनसोड (मुख्य कार्यकारी आधिकारी जि.प.नाशिक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaching rural students through television in nashik marathi news