आता कसं होणार..? संस्थेला ऍडमिशनचे..अन्‌ प्राध्यापकांना पगाराचे टेन्शन... 

_teacher.jpg
_teacher.jpg

नाशिक / येवला : जून सुरू झाला की विद्यार्थी- पालकांना निकालाचे व नव्या वर्गाच्या प्रवेशाचे वेध लागतात. सोबतच संस्थाचालक व प्राध्यापक, शिक्षकांनाही वर्गाच्या इनटेक फुल करण्याचे... मात्र यंदाचा जून याला अपवाद ठरला असून, कोरोनाने शैक्षणिक कार्यक्रमच ठप्प केला आहे. त्यामुळे थकीत शुल्क वसुलीसह नवे ऍडमिशन अन्‌ आर्थिक उद्दिष्टपूर्तीचे संस्थाचालकांचे टेन्शन वाढले असून, या विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांत कार्यरत असणाऱ्या 15 हजारांवर प्राध्यापक- शिक्षकांची आपल्या पगाराचे कसे होणार, या विचाराने झोप उडवली आहे. अनेक पालकदेखील मुलांच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त आहेत. 

उलाढाल हजार कोटीच्या आसपास

जिल्ह्यातील पंधरा हजार प्राध्यापक- शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न गंभीर 
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना शासन अनुदान देत नसून सर्वत्र शिक्षण संस्थाचालकांनी विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी, विधी, तंत्रनिकेतन, मेडिकलसह सर्वच अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू केली आहेत. जिल्ह्याचा विचार केल्यास विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासह गलेलठ्ठ शुल्क आकारणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या मिळून दीड हजारापर्यंत महाविद्यालय व शाळा आहेत. ही सर्व ज्ञानदान करणारी मंदिरे विनाअनुदानित असल्याने विद्यार्थ्यांचे शुल्क किंवा शुल्कापोटी शासनाकडून शिष्यवृत्ती घेऊन सर्व खर्च शिक्षण संस्था चालवतात. जिल्ह्यात अशी उलाढाल हजार कोटीच्या आसपास असेल.

परीक्षाच नसल्याने फी वसूल कशी करणार?

मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा- महाविद्यालय बंद झाल्याने आहे, त्या वर्गातील विद्यार्थ्यांकडे संस्थाचालकांचे चारशे ते पाचशे कोटी रुपयांचे शिक्षणशुल्क बाकी आहे. त्यातच परीक्षेच्या तोंडावर ही वसुली होते. पण यंदा परीक्षाच नसल्याने वसूल कशी करणार, हा प्रश्‍नही संस्थांना पडला आहे. मागच्या वर्षाची ही गत तर आलेल्या नव्या वर्षासाठी अद्याप प्रवेशाचे नियोजनच नसल्याने पुन्हा नवीन वर्षातील आर्थिक भुर्दंडही सहन करण्याची वेळ संस्थांवर आली आहे. काही अभ्यासक्रमासाठी लाखो रुपयांचे डोनेशनदेखील मिळते. पण यंदा मंदी असल्याने संस्थाचालकही टेन्शनमध्ये आहेत. दहावी, बारावीसह पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना या मंदीचा फटका बसणार असून, वर्ष वाया जाणार असल्याने पालकही चिंतेत आहेत. 

सर्वाधिक चिंता शिक्षकांना... 
खासगी संस्थांच्या विनाअनुदानित महाविद्यालयांना शासन अनुदान नसल्याने संस्थाचालक शिक्षकांचे पगार करतात. जिल्ह्यात जवळपास 15 ते 18 हजार शिक्षक विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत आहेत. या शिक्षण संस्थाच त्यांच्या तारणहार आहेत. मात्र काही संस्थांनी लॉकडाउनच्या काळातील पगार दिले तर काहींनी अद्यापही दिलेले नाहीत. शिवाय नवीन वर्ष सुरू झाले. मात्र प्रवेश व मागील शुल्क वसुलीही नसल्याने आता आपल्या वेतनाचे काय होणार, हा मोठा प्रश्‍न शिक्षक- प्राध्यापकांना पडला आहे. 

तुकड्या अन्‌ वेतनकपातीची मोठी नामुष्की
कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र लॉकडाउन झाले आहे. आजच अनेक शाळा व महाविद्यालये आर्थिक अडचणीत सापडली आहेत. जे शिक्षक विनाअनुदानित महाविद्यालयात अगोदरच अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करतात. त्यांच्यावर तुकड्या अन्‌ वेतनकपातीची मोठी नामुष्की ओढवेल. या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक सरकारी धोरण अमलात आणण्याची गरज आहे. - प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, शिक्षण अभ्यासक 

राज्यातील महाविद्यालये - 
अभियांत्रिकी- 343 
बी.फार्मसी- 293 
डी.फार्मसी- 396 
अर्किटेक्‍चर- 94 
तंत्रनिकेतन- 401 
एमबीए- 330 
सीनिअर कॉलेज- 455 (पुणे विद्यापीठ) 
बीडीएस- 28 
एमबीबीएस- 51 + 10 
बीएएमएस- 72 + 3 
बीएचएमएस- 50 + 1 


नाशिक जिल्ह्यातील स्थिती... 
अभ्यासक्रम --- कॉलेज संख्या ---- प्रवेश क्षमता 
अभियांत्रिकी ---------19----------7786 
तंत्रनिकेतन -----------24---------9084 
बी.फार्म. -------------24----------1790 
डी फार्म. -------------30----------1800 
बी.आर्च. --------------4------------200 
बी.एस्सी. ऍग्री. ---------4------------360 
बी.एस्सी. होर्टि ----------1-------------40 
बी.टेक (बायो) ---------1-------------80 
बी.टेक (फूड) ----------1-------------80 
बी.टेक (ऍग्री) ----------1-------------80 
हॉटेल मॅनेजमेंट ----------1-------------60 
एमबीए ----------------22----------1920 
बी.एड. -----------------21---------1550 
डी.एड. -----------------35---------1805 
एम.एड. -------------------2----------100 
बी. एस्सी नर्सिंग-------------6---------270 
बीएएमएस---------------4----------230 
बीएचएमएस--------------4----------320 
एमबीबीएस --------------2----------270 
बीडीएस ------------------2---------200 
आयटीआय ----------------33-------6544 
(शासकीय- 15, खासगी- 18) 
वरिष्ठ महाविद्यालय---------- 189---- 80,000 
(सर्व शाखा) 
कनिष्ठ महाविद्यालय----------428-----67, 866 
कृषी पदविका----------------10----------600 
पशुधन-दुग्धोत्पादन पदविका -----4-----------240 
इंग्लिश मीडियम स्कूल -------500----40 ते 50 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com