चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित! वाजगावला २० क्विंटल कांदा चोरीस; शेतकरी चिंतेत

मोठाभाऊ पगार
Monday, 26 October 2020

बाजारात भाजीपाल्याबरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे 

नाशिक/देवळा : सध्या कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने वाजगाव (ता. देवळा) येथे रविवारी रात्री (ता. २५) कांद्याची चोरी झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. येथील संजय देवरे यांच्या शेतातील चाळीत साठवून ठेवलेल्या १५ ते २० क्विंटल कांद्यावर चोरांनी डल्ला मारला. बाजारात भाजीपाल्याबरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे 

बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार होत असल्याने व निश्चित भाव नसल्याने देवरे यांनी वाजगाव येथील चणकापूर उजव्या कालव्याशेजारी, वाजगाव-खर्डा रस्त्यालगतच्या शेतातील (गट नं. ५४५) चाळीत ३०० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. यातील काही कांद्याची त्यांनी बाजारात विक्री केली. शिल्लक ५० क्विंटल कांद्याची निवड करून कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने तो चाळीत ठेवला. परंतु रविवारी रात्री चोरट्यांनी चाळीतील शिल्लक पन्नास क्विंटलपैकी जवळपास २० क्विंटल कांदा लंपास केला. सोमवारी (ता.२६) सकाळी देवरे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस ठाण्यात कांदा चोरीला गेल्याची फिर्याद दिली. 

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of onion at Vajgaon nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: