esakal | रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

चोरट्यांनी एकाच रात्री एकूण ९ ठिकाणी चोरी करून डल्ला मारल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे व उज्वलसिंग राजपूत यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक/येवला : मंगळवारी (ता.२०) मध्यरात्री ते पहाटे दरम्यान तालुक्यातील रहाडी व खरवंडी येथे अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ ठिकाणी घरफोड्या करत धुमाकूळ घालत रोख रक्कम, सोने चांदीचा ऐवज, मोबाईल संच आणि दुचाकी असा ऐवज चोरून नेला आहे. पोलिसानी यातील सात चोऱ्यांचे गुन्हे दाखल केले आहेत. 

रहाडी येथील बाबासाहेब गायकवाड यांच्या वस्तीवर गायकवाड कुटुंब रात्री लाईट नसल्याने पडवीत झोपले असताना महिलेच्या गळयातील अंदाजे ३० हजार रुपयांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. शेजारील अशोक गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी तसेच सोपान गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.

याच रात्री चोरट्यांनी रहाडी गावातील सिद्धार्थ रोकडे हा घराच्या पडवीत झोपला असताना त्याच्या उशाखालील २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याच मध्यरात्री चोरट्यांनी रहाडी गावातील शेख वस्तीवर मोर्चा वळवत अमीन उस्मान शेख यांचा घरात प्रवेश करत लोखंडी पेटीतील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच रसूल शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील १ तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर सद्दाम महेमूद शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दीड तोळे सोने चोरून नेले. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

रहाडी गावातच एकाच रात्री आठवी चोरी करण्याचा विक्रमही चोरट्यांनी केला. आसाराम गांगुर्डे हे घराबाहेर अंगणात झोपले असताना त्यांच्याकडील १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. रहाडी गावाजवळ असलेल्या खरवंडी गावातील दत्तू संपत आहेर यांच्या घरातील पेटीतील अडीच तोळे सोने व ६ हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी एकाच रात्री एकूण ९ ठिकाणी चोरी करून डल्ला मारल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे व उज्वलसिंग राजपूत यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर