प्रथा की व्यथा? 'या' बाळांचा जन्म होताच पिता ठरतोय आरोपी; आठवड्यात किमान दोन घटना समोर

newborn-baby_.jpg
newborn-baby_.jpg

नाशिक : आधारकार्ड अपडेट नाही, लॉकडाउनच्या काळात विवाहाऐवजी साखरपुडा करूनच एकत्र राहणाऱ्या दांपत्याला सध्या वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. महिलेवर कुमारी, तर जन्मतारखेच्या घोळामुळे अल्पवयीन माता, तर पित्यावर पॉस्को कायद्यातील आरोपी होण्याची वेळ येत आहे. आधारकार्डातील त्रुटी आणि लॉकडाउनच्या काळात विवाहाशिवाय एकत्र राहण्याच्या ॲडजेस्टमेंट (प्रथाही) मुळे आठवड्याला किमान दोन तरी घटना पुढे येत आहेत. 

लॉकडाउनमुळे विवाहाविनाच प्रसूत महिलांची समस्या 

लॉकडाउनच्या काळात जनजीवन ठप्प असल्याने अनेक कुटुंबांनी साखरपुडे करून थेट संसार सुरु केला. शासकीय कार्यालयाशिवाय जिल्हाभर आधारकार्ड नोंदणी, दुरुस्तीची कामे वर्षापासून बंदच होती. शहरी भागात आधारकार्डाच्या नोंदीसाठी जिथे महा-ई-सेवा केंद्राचा शोध घेत शिक्षितांना फिरावे लागते. तेथे आदिवासी तालुक्यातील दुर्गम वाड्या-पाड्यावरील अशिक्षित नागरिकांच्या अडचणीची कल्पना केलेलीच बरी. आधारकार्ड नोंदणीच बंद असल्याने अनेकांना आधारकार्ड अपडेट करता आलेले नाही. त्यामुळे कधी काळी सोयीनुसार केलेल्या आधार नोंदीमुळे जन्मतारीख चुकली म्हणून, काही महिलांवर अल्पवयीन माता ठरण्याची वेळ आली आहे. 

लॉकडाउन, प्रथा अन् कुमारी माता 

जिल्ह्यातील अनेक समाजात विवाहाशिवाय एकत्र राहण्याची पारंपरिक रीत आहे. नातेवाईक आप्तस्वकीयांसमोर साखरपुडा उरकायचा आणि युवतीने सासरी जाऊन संसार सुरू करायच्या पारंपरिक रितीत सोयीनुसार जमेल तेव्हा अशी कुटुंब विवाह करतात. अनेक कुटुंब अगदी म्हातारपणी सामूहिक विवाहात विवाह बंधनात अडकून घेतात. तोपर्यत परस्पर संमतीने एकत्र राहतात. लॉकडाउनच्या काळात अशा केवळ साखरपुडा करून परस्पर संमतीने एकत्र राहणाऱ्या दांपत्यांची संख्या वाढली. पण त्यातून यंदाच्या २०२१ नव्या वर्षात नवाच प्रश्न समोर आला आहे. विशेषतः आदिवासीबहुल तालुक्यात अशा नवदांपत्यांत कुमारी माता आणि जन्मतारखा चुकीच्या असल्याने अल्पवयीन माता म्हणून पोलिस दप्तरी नोंदीची वेळ आली आहे. 

दर आठवड्याला दोन घटना 

नव्या वर्षात साधारण आठवड्याला दोन घटना या प्रमाणात कुमारी माता अशा नोंदी पोलिस दप्तरी दिसत आहेत. अशा दांपत्याला मूल होते, तेव्हा रुग्णालयात एमएलसी आणि पोलिस दप्तरी त्याची नोंद करताना मात्र यंत्रणेची अडचण होते. एमएलसी नोंदीदरम्यान विवाह झालेला नसल्याचे सांगितले म्हणजे पोलिसांकडून थेट कुमारी माता अशाच नोंदी होतात. साहजिकच, कुमारी माता अशी नोंद झाली म्हणजे मुलीच्या पित्याचा शोध पोलिसांकडून सुरू होतो. अशात, जर संबधित महिलेचे आधारकार्ड अपडेट नसेल किंवा जन्मतारीख चुकलेली असेल, तर अडचण गंभीर बनते. कारण कमी वय आधारकार्डावरील चुकीच्या वयामुळे प्रसूत महिला थेट अल्पवयीन माता ठरते. अल्पवयीन माता अशी एमएलसी नोंद झाली. तर बाळाच्या पित्याला थेट आरोपी होण्यासारखा गंभीर प्रकाराला तोंड देताना घामाघूम व्हावे लागते. 

पिता पॉस्कोचा आरोपी 

पॉस्को कायद्यानुसार अल्पवयीन मुलीशी संमतीने अथवा विनासंमती संबंध ठेवणे हाच गंभीर अपराध आहे. त्यामुळे केवळ आधारकार्डवरील तारीख अपडेट केलेली नाही किंवा अल्पवयीन म्हणून नोंद झालेल्या महिलेच्या पतीवर पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्ह्यात आरोपी होण्याची वेळ येते. हे सगळे जिल्ह्यात अनुभवास येत आहे. मूल झाल्याचा आनंद, तर दूरच काही दांपत्यावर थेट एका बाजूला महिलेची प्रसूती, तर दुसरीकडे पित्यावर पॉस्को कारवाई, अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागण्याची वेळ येत आहे. 

साखरपुड्यानंतर अनेक युवती पतीसोबत सासरी राहायला जातात. पण जेव्हा प्रसूतीदरम्यान रुग्णालयात नोंदीदरम्यान, विवाह व्हायचा आहे. असे सांगण्याने संबंधित मातेचा उल्लेख ‘कुमारी माता’ असाच होतो. पारंपरिक प्रथेनुसार हे घडत असले, तरी कायदेशीरदृष्ट्या मात्र ‘कुमारी माता’ या नोंदीमुळे हा विषय किचकट होतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com