अकरावीत प्रवेश घेताय?...कागदपत्रांची जुळवाजुळव बाकी आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी

अरुण मलाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे उद्‍भवलेल्‍या परिस्‍थितीत शासकीय कार्यालयांचे कामकाज प्रभावित झालेले आहे. यामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रांची जमवाजमव करताना विद्यार्थ्यांची दमछाक होते आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीत प्रवेशाकरिता कागदपत्रे सादरीकरणात शिथिलता दिली जाणार आहे. 

नाशिक : कोरोनामुळे उद्‍भवलेल्‍या परिस्‍थितीत शासकीय कार्यालयांचे कामकाज प्रभावित झालेले आहे. यामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रांची जमवाजमव करताना विद्यार्थ्यांची दमछाक होते आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीत प्रवेशाकरिता कागदपत्रे सादरीकरणात शिथिलता दिली जाणार आहे. 

कागदपत्रे सादरीकरणासाठी मुदत

राज्‍यभरातील प्रमुख महापालिका क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अकरावीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीच्‍या प्रवेश प्रक्रियेत दहावीची गुणपत्रिका व हमीपत्राच्‍या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. कागदपत्रे सादरीकरणासाठी तीन महिन्‍यांची मुदत दिली जाणार आहे. शासकीय परिपत्रकात म्‍हटले आहे, की अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना दहावीचे ऑनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक असेल. शाळा सोडल्‍याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोड नसल्‍याचे प्रमाणपत्र ही प्रमाणपत्रे उपलब्‍ध असतील, तर विद्यार्थ्यांनी अपलोड करावीत. तथापि, प्रमाणपत्रे अपलोड, सादर करणे बंधनकारक केले जाऊ नये. 

सत्‍यतेबाबतची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची

क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्र, दिव्‍यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्‍पग्रस्‍त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना अपलोड करायची आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे आवश्‍यक प्रमाणपत्रे सादर करणे शक्‍य नसलेल्‍या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घ्यायचे असून, प्रमाणपत्रे सादरीकरणासाठी तीन महिन्‍यांची मुदत देण्याचे स्‍पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्‍या माहितीच्‍या आधारे प्रवेश दिला जात असून, सत्‍यतेबाबतची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असणार आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

आजपासून अर्जाचा भाग एक भरण्यास सुरवात 

गेल्‍या २६ जुलैपासून अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली असून, २० हजार १४० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे. या प्रक्रियेतील पहिल्‍या टप्प्‍यात शनिवार (ता. १)पासून अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्‍यांची वैयक्‍तिक माहिती भरून अर्ज पडताळणी करायची आहे.  

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a period of three months for submission of documents for 11th admission nashik marathi news