आश्चर्यच! एका महिन्यात दिसणार चक्क तीन ग्रहण?? ज्योतिषशास्त्रातील जाणकार म्हणतात...

grahan 123.jpg
grahan 123.jpg

नाशिक : कोरोनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे खगोलप्रेमींना घरबसल्या आकाशनिरीक्षणांची मोठी संधी या महिनाभराच्या कालावधीत मिळणार आहे. या एकाच महिन्यात तीन ग्रहणे अनुभवण्याची व अभ्यासण्याची ही संधी आहे. दरम्यान, दुसरीकडे अशा दुर्मिळ परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्तीची भीती घालणारे विविध संदेशही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यापासून मात्र सावध राहण्याची गरज आहे. 

सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार
येत्या 5 जूनला चंद्रग्रहण, त्यानंतर 21 जूनला सूर्यग्रहण, तर 5 जुलैला पुन्हा चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात तीन ग्रहणे अनुभवण्याच्या या संधीत येत्या 21 जूनला येणारे सूर्यग्रहण हे केवळ भारतातच दिसणार आहे, तर 5 जून व 5 जुलैची चंद्रग्रहणे ही "छायाकल्प' स्वरूपाची असणार आहेत. दरम्यान, 21 जूनचे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार असल्याने या ग्रहणाचे वेदादी नियम गर्भवती व सर्व लोकांनी पाळावेत, असे ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. चंद्रग्रहणे उघड्या डोळ्यांनी पाहता येणे शक्‍य असले, तरी सूर्यग्रहण पाहताना मात्र डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 
 
ग्रहणकाळ 
5 जूनचे चंद्रग्रहण रात्री सव्वाअकरा ते सहा जूनच्या पहाटे दोन वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण संपूर्ण भारतासह युरोप, आफ्रिका, आशिया आणि आस्ट्रेलिया खंडांमध्ये दिसणार आहे. या कालावधीतील एकूणच ग्रहस्थितीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, त्यामुळे प्रामुख्याने शेअर बाजाराशी संबंधितांनी अधिक सावध राहावे, तसेच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा संशयास्पद मृत्यूसुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारची ही ग्रहस्थिती असेल, असे ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यानंतर 21 जूनला येणारे सूर्यग्रहण सकाळी सव्वानऊ ते दुपारी तीन वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण फक्त भारतात पूर्णत: पाहता येणार असून, त्याबरोबर फक्त दक्षिण-पूर्व युरोप व आशिया खंडाच्या काही भागातच दिसणार आहे, तर 5 जुलैचे चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून 37 मिनिटांपासून अकरा वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल व ते अमेरिका, दक्षिण-पूर्व युरोप व आफ्रिका खंडात बघता येईल. 

चंद्रग्रहणाचे तीन प्रकार 
चंद्रग्रहणाचे तीन प्रकार असतात. पहिला पूर्ण चंद्रग्रहण, दुसरा आंशिक चंद्रग्रहण आणि तिसरा छायाकल्प चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते, तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडू लागते. याला पूर्ण चंद्रग्रहण असे म्हटले जाते. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवरदेखील पडत नाही, तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्रग्रहणापेक्षा कमजोर असते. त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जाते. 

खग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो 
खंडग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या अर्धवट छायेतून जातो 
छायाकल्प चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो 

चंद्रग्रहणे छायाकल्प स्वरूपाची 
ग्रहण ही सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्यात चालणारी आकाशातील विलोभनीय घटना आहे. वर्षातील काही अमावस्यांना आणि काही पौर्णिमांना या तीन वस्तू काहीशा एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी सूर्यग्रहण वा चंद्रग्रहण लागते. या वर्षी एकूण सहा ग्रहणे असून, त्यात चार चंद्रग्रहणे, तर दोन सूर्यग्रहणे आहेत. या ग्रहणांचा कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. कृपया यांचा संबंध कोरोनाशी जोडू नये. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यातील हा ऊन-सावल्यांचा अनोखा खेळ समजावा आणि त्याचा आनंद लुटावा. -डॉ. निवास पाटील, ज्येष्ठ खगोल अभ्यासक 

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!
 
वटपौर्णिमेला (ता. 5) छायाकल्प चंद्रग्रहण, 21 जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण, तर येत्या 5 जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला पुन्हा छायाकल्प चंद्रग्रहण आहे. मात्र, यामुळे आपल्या राज्यावर, देशावर किंवा जगावर कोणत्याही प्रकारचे संकट येण्याचा काहीच संबंध नाही. ही एक नेहमीची खगोलीय घटना आहे. खगोल अभ्यासक, विद्यार्थी व खगोलप्रेमींनी योग्य ती काळजी घेऊन या तिन्ही वेळा खगोलीय घटनेचा आनंद जरूर घ्यावा. -रमाकांत देशपांडे, खगोल अभ्यासक 

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'

जेव्हा कधी एक महिन्यात तीन ग्रहणे येतात, तो एक चिंतेचा विषय होतो. कारण, त्याचे जागतिक स्थितीवर परिणाम होतात. भारताची अर्थव्यवस्था प्रभावित होईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा गूढ मृत्यूही संभवतो. मोठ्या जागतिक घडामोडी घडतील. युद्धजन्य स्थिती निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीही येऊ शकते. त्यामुळे जागतिक पातळीवर मोठे परिवर्तन, बदल होईल. -पं. नरेंद्र धारणे, ज्योतिष अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com