तब्बल तीस तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा लागला पत्ता;  शोधपथकाला यश

devnadi pool.jpg
devnadi pool.jpg

नाशिक / सिन्नर : तालुक्यातील वडांगळी ते खडांगळी या गावांदरम्यान असणाऱ्या देवनदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा ३० तास उलटून देखील थांगपत्ता लागलेला नव्हता. यातच वाहून गेलेल्या तरुणाच्या चौकशीसाठीदेखील अद्याप कुणीही पुढे न आल्यामुळे पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. अखेर तब्बल ३० तासानंतर त्या तरुणाचा शोध लागला असून त्याची ओळख पटली आहे.

वाहून गेलेल्या तरुणाची ओळख पटली

राजू गोपाल जाधव (वय 50) रा.वावी ता.सिन्नर मयताचे नाव आहे. देवनदी पुरात वाहून गेलेली व्यक्ती सापडली आहे. (ता.२५) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जीवरक्षक पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर व्यक्ती भुसावळ येथील रहिवासी असून वडांगळी येथील नातेवाईकांकडे आला होता. वावीला बहिणीकडे जायचे असल्याने तो नदी ओलांडून पलीकडे गेला, मात्र पुन्हा माघारी फिरला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पुलापासून 150 फूट अंतरावर गाळात फसलेला मृतदेह शोधण्यास पथकाला यश आले. वावी येथील नातेवाईक घटनास्थळी गेले आहेत. तेच मृतदेहाचा ताबा घेतील.
 

देवनदीत पुरात वाहून गेलेला तरुण

वडांगळी येथे आठवडेबाजार असल्याने खडांगळीच्या बाजूने अनेक जण देवनदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याची पर्वा न करता ये-जा करत होते. बुधवारी (ता. २३) दुपारी तीनला पंचविशीतील एक तरुणदेखील पाण्यातून रस्ता काढत असताना नदीपात्रात ओढला जाऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. या वेळी प्रत्यक्षदर्शीने आरडाओरड केल्याने बाजारातील अनेक जण नदीपात्राकडे धावले होते. प्रवाह अधिक असल्याने पाण्यात उड्या घेतलेल्या अन्य तरुणांची दमछाक झाली. गुरुवारी (ता. २४) सकाळपासून एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गौरव सानप यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुलापासून देवना बंधाऱ्यापर्यंतचा परिसरदेखील पिंजून काढला. मात्र, वाहून गेलेल्या तरुणाचा मागमूस मिळाला नाही. घटना घडल्यानंतर परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा झाली.

पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात

तरीदेखील तब्बल ३० तास उलटूनही त्या अनोळखी तरुणाच्या चौकशीसाठी कुणीही पुढे आले नव्हते. पोलिसांनी परिसरातील आठ-दहा गावांमध्ये चौकशी करून कुणी तरुण बेपत्ता आहे काय हे शोधण्याचादेखील प्रयत्न केला. परिसरात खरीप पिकांच्या सोंगणीसाठी पेठ, सुरगाणा या भागातील शेकडो मजूर आलेले आहेत. वाहून गेलेला त्यांच्यापैकी असावा या शक्यतेनेदेखील तपास करण्यात आला. तरीदेखील काहीच हाती न लागल्याने पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 
बुधवारीच पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्यामार्फत जिल्हा व्यवस्थापन कक्षास कळविले होते. गुरुवारी चांदोरी येथील जीवरक्षक पथक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे पथक दुसऱ्या एका मोहिमेवर असल्याने संध्याकाळपर्यंत वडांगळीत पोचू शकले शकले नव्हते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com