मामाचं गाव..उन्हाळी सुटीची मजा..अन् तीन बहिणींचा करूण अंत..

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 May 2020

मे महिना..उन्हाळी सुटीची मजा..लॉकडाऊन.. अशातच आपल्या मामाची मुलगी पूनम हिच्यासोबत निशा व योगिता बुधवारी दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात अंघोळीसाठी गेल्या होत्या. पण त्यावेळीच अशी काही धक्कादायक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली.

नाशिक / पेठ : मे महिना..उन्हाळी सुटीची मजा..लॉकडाऊन.. अशातच आपल्या मामाची मुलगी पूनम हिच्यासोबत निशा व योगिता बुधवारी दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात अंघोळीसाठी गेल्या होत्या. पण त्यावेळीच अशी काही धक्कादायक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली.

अशी घडली घटना...

उभी धोंड येथील रहिवासी निशा पंढरीनाथ किलबिले (वय 9) व तिची मोठी बहीण योगिता पंढरीनाथ किलबिले (वय 12, दोघी रा. उभी धोंड) या अंबापूर येथील आजोबा नामदेव बोके यांच्याकडे मंगळवारी (ता. 12) पाहुण्या म्हणून आल्या होत्या. आपल्या मामाची मुलगी पूनम संतोष बोके (13) हिच्यासोबत निशा व योगिता बुधवारी दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात अंघोळीसाठी गेल्या होत्या. अंघोळ करताना खोल पाणी व तलावातील गाळाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. मात्र एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघींना आपला जीव गमवावा लागला. काठावर असलेल्या एका मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. पेठ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी तहसीलदार संदीप भोसले व पोलिस उपनिरीक्षक राधेश्‍याम गाडे पाटील उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

तालुक्‍यातील अंबापूर येथे उन्हाळी सुटीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन बहिणींसमवेत मामाची मुलगी अशा तिघींचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 13) दुपारी घडली. पेठ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक निरीक्षक जाडर तपास करीत आहेत.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three sisters drown in khambale lake nashik marathi news