सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

chori.jpg
chori.jpg

नाशिक : (इंदिरानगर) बिट मार्शलचा पाठलाग चुकवत पुढे आल्यानंतर दोघांनी हा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले. दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी महिलेची पर्स खेचली खरी... मात्र बिरारी यांनी चारचाकीने या दोघांचा पाठलाग केला...विशेष म्हणजे पांडवनगरी भागात महिलेची पोत हिसकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सविस्तर प्रकार असा की...

अशी आहे घटना

राजीवनगरमध्ये गुरुवारी (ता.21) दुपारी बाराच्या सुमाराला देवानंद बिरारी राणेनगरकडे जात असताना त्यांनी सम्राट स्वीट्‌ससमोर दुचाकीने (एमएच 19 डब्ल्यू 6953) जात असलेल्या दोघांनी पायी चालणाऱ्या उमा भोसले (रा. गणेश कॉलनी, किशोरनगर) यांच्या हातातील पर्स ओढल्याचे बघितले. त्यांनी क्षणात चारचाकी या दोघांच्या मागे नेली. संशयितांच्या लक्षात आल्याने त्यांनी जाणीवपूर्वक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला दुचाकी नेली. श्री. बिरारीही त्यांच्यामागे गेले. संशयित पुन्हा डाव्या बाजूला आले, मागे बिरारी होतेच. शारदा शाळेजवळ बिरारी यांनी त्यांना अगदी कोपऱ्यात घातले. त्याचदरम्यान समोरून दुचाकीवर येणाऱ्या एका महिलेवर धडकून दोघेही खाली पडले. दुचाकी तेथेच सोडून ते राणेनगर वसाहतीमध्ये गेले. बिरारी यांनी आरडाओरडा करायला सुरवात केल्याने नंदू कुलकर्णी, पप्पू काळे, विनोद दळवी, प्रशांत दिघे, रोहन मुळे यांनी बेकरीजवळ स्थानिकांच्या मदतीने दोघांना पकडले. सर्वांनीच या दोघांना बेदम चोप दिला. 

नागरिकांच्या धाडसीपणाला शाबासकी

या नाट्यापूर्वी संशयित तुषार गोरडे (रा. दातली, ता. सिन्नर) आणि अनिकेत सानप (रा. संगमनेर) यांनी पांडवनगरी भागात रेणुका कुंभार यांची पोत खेचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महिलेने किरकोळ जखमी असताना तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले. ही माहिती कलानगर येथे असलेल्या रवींद्र राजपूत, दिनेश पाटील आणि मुश्रीफ शेख या बिट मार्शलला कळली. त्यांनी दोघांना हटकले. मात्र हे दोघे राणेनगरकडे सुसाट निघाले. या काळात बिरारी यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. बिट मार्शल यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक पांडुरंग पाटील, भगवान शिंदे, राजेश निकम आणि साहेबराव ठाकरे घटनास्थळी पोचले. दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. महिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची पर्स आदी वस्तू ताब्यात देण्यात आल्या. नागरिकांनी दाखविलेल्या धाडसाचे वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी कौतुक करत बिट मार्शलांनाही शाबासकी दिली. 

महिलेची पर्स डोळ्यादेखत ओढल्याचे बघितले. थेट दोघांच्या मागे गेलो. स्थानिक युवकांच्या मदतीने यांना पकडण्यात यश मिळाले. पोलिस मागावर असताना पुन्हा याच प्रकारचा गुन्हा करणे म्हणजे हे सराईत गुन्हेगार आहेत हे स्पष्ट करते. - देवानंद बिरारी, माजी महानगरप्रमुख, शिवसेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com