सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

एस. डी. आहीरे
Wednesday, 30 December 2020

आपट्याच्या पानाला दसऱा सणालाच महत्त्व असते, तो दिवस सरलाकी आपट्याचा पालापाचोळा होतो. राजकारणातही असेच चित्र असते. सत्तेच्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर अनेकांना जीवनातील भयाण वास्तवाचा सामना करावा लागतो. असेच नाशिक जिल्ह्यातील सरपंचाच्या वाट्याला आलेले आहे.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : आपट्याच्या पानाला दसऱा सणालाच महत्त्व असते, तो दिवस सरलाकी आपट्याचा पालापाचोळा होतो. राजकारणातही असेच चित्र असते. सत्तेच्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर अनेकांना जीवनातील भयाण वास्तवाचा सामना करावा लागतो. असेच नाशिक जिल्ह्यातील सरपंचाच्या वाट्याला आलेले आहे.

सत्तेच्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमीत्ताने हुरळून गेलेल्या तरूणाईला सरपंचपदासाठी गुंडघ्याला बाशींग बांधले आहे. गावगाड्यचा कारभार हाती घेण्याची स्वप्ने पाहत राजकारणाचा अनुभव असलेले, नसलेले हौसे, गवसे असे सर्वच आपले राजकीय अस्तितिव जाणुन घेण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेच. नवा जोश, नक्की निवडून येणार असा कार्यकर्त्याकडुन वाढत असलेला हुरूप यामुळे अनेक जण कौटुबींक परिस्थिती नसतांना पदरमोड करून निवडुन लढतात. पुढे सरपंच होतात. पद आल्याने पारंपारिक कौटुबिक उदरनिर्वाहाच्या कामाकडे दुर्लक्ष होते. व नंतर त्याचे चटके बसु लागतात.

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

कार्यकाळ संपला अन् पुढे कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहीला

सरपंचपदावरून दुर झाल्यानंतर मानपान तर जातो. शिवाय आर्थिक विवंचना भेडसावते. सन २००१ मध्ये कोकणगांव (ता.निफाड) येथील शिवाजी छबु पोटींदे हे मित्र परिवार व ग्रामस्थांच्या आग्रहाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मुलीच्या लग्नासाठी जमविलेली पुंजी कर्च करून व इतरांच्या आर्थिक मदतीने निवडणुक लढविली. निवडणुक जिंकली आणि पोटींदे हे कोकणगांवच्या सरपंचपदी विराजमान झाले. निस्वार्थीपण गावचा कारभार हाकला. पाच वर्ष सरपंचपदावर असतांना ग्रामविकास बरोबरच सर्वसामान्याचे प्रश्‍न सोडविले. पण सरंपच पदावर असल्याने शेतीवरील सालगड्याची नोकरी नाईलाजाने सोडण्याची वेळ आली. सन २००५ मध्ये सरपंच पदाला पोटींदे यांचा कार्यकाळ संपला. अन पुढे कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहीला. वयाची पन्नाशी ओलाडलेले शिवाजी पोंटीदे हे गेली दहा वर्षापासुन कोकणगांवच्या पेट्रोलपंपावर कर्मचारी म्हणून काम करीत आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

पोटींदे, कंक यांच्यासारखी अनेक उदाहरणे
अशीच वेळ वर्षभरापुर्वी सरपंचपदावरून दुर झालेल्या कारसुळ (ता.निफाड) येथील रामकृष्ण कंक यांच्यावर आली आहे. पाच वर्ष सरपंच असतांना मान रूतबा मिळाला. पण त्याच दरम्यान उत्पन्नाचे साधन असलेल्या फोटोग्राफी व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. आता कंक हे द्राक्षबागाच्या छाटणीसह विविध कामावर जात आहे. राजकीय दुष्टया सजग व संवेदनशील असलेल्या निफाड तालुक्यात पोटींदे, कंक यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. 

अनुभवातून युवकांनी धडा घ्यावा 
स्वप्नातही राजकारणाचा विचार न केलेल्या सर्वसामान्यांना प्रस्थापितांच्या मर्जीनुसार राजकीय आखाड्यात उतरावे लागले व आरक्षणमुळे त्यांच्या आशिर्वादाने सरपंचपद भुषवावे लागले. ज्यांनी निवडणुकीसाठी आग्रह धरला किंवा वापर करून घेताल ते मात्र आता विचारायला नाहीत. त्यामुळे राजकारणाला आपले करिअर समजून निवडणू लढणार्या युवानेत्यांनी शिवाजी पोटींदे,रामकृष्ण कंक यांच्या अनुभवातुन धडा घ्यावा. पुढच्याला ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आपला आर्थिक पाया घट्ट करूनच राजकारणात पाय ठेवायला हरकत नाही. 

पद गेल्यानंतर ज्यांची कामे केली त्यांना आमचा विसर पडला. निवडणुक विरोधात लढलो म्हणुन प्रतिस्पर्धाशी कायमच वैरी झाले. आर्थिक दुष्टया सक्षम असेल तरच गावगुंडीच्या राजकारणात पाय ठेवा. पोटाला मानपानाची नाही तर भाकर तुकड्याची गरज असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तरूणाईने जास्त हुरळुन न जाऊ नये. -शिवाजी पोटींदे (माजी सरपंच, कोकणगाव). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: time changes for former sarpanch nashik marathi news