हॉटेल, रेस्टॉरंटना वेळेच्या बंधनाचा अडथळा; ग्राहक फक्त नाश्त्यापुरतेच मर्यादित

Time constraint on hotels, restaurants nashik marathi news
Time constraint on hotels, restaurants nashik marathi news

नाशिक : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पुनश्‍च हरि ओम मोहिमेंतर्गत राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये मात्र वेळेच्या बंधनामुळे अद्यापही व्यवसायात अडथळे येत आहेत. शहरात ४० टक्क्यांहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट व बार बंद असल्याने नफ्याचा आलेख वर आणण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

सात महिन्यांत शहर व जिल्ह्यात मिळून साडेचार हजार कोटींचा दणका बसला आहे. नव्याने हॉटेल्स सुरू करायच्या भांडवलासह अन्य बाबी पुन्हा नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत. राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू करताना दोन दिवसांपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेची अट निश्‍चित करण्याचे बंधन टाकले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री दहापर्यंत परवानगी दिली. परंतु नाशिकमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सात, ही वेळेची अट टाकल्याने पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू झाले नाही. बारमध्ये रात्री गर्दी होते, तर जेवणाची वेळदेखील सायंकाळी सातनंतर असल्याने सकाळी दहा ते रात्री दहा, ही बारा तासांची वेळ ठरविण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या आधार संघटनेने केली आहे. दोन दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नाश्‍ता करण्यासाठीच ग्राहक हॉटेल्समध्ये जात आहेत. 

करांच्या नोटिसांनी व्यावसायिक हैराण 

हॉटेल सुरू झाल्यानंतर व्यवसाय पूर्वपदावर येत नाही, तोच करांच्या नोटिसा येऊ लागल्याने व्यावसायिक हैराण झाले आहेत. वीजबिल, कामगारांचे पगार, महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टी, वॅट, जीएसटी, उत्पन्न कर आदी करांचा भरणा करावा लागणार असल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत. 

साडेचार हजार कोटींचा दणका 

मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून ते आतापर्यंत सात महिन्यांच्या कालावधीत शहर व जिल्हा मिळून सरासरी साडेचार हजार कोटींचा दणका बसला आहे. शहरात ९९५ बार, तीन हजार रेस्टॉरंट, तर, पाचशेच्या आसपास लॉजिंग आहेत. वार्षिक सरासरी एक कोटीची उलाढाल होते. पूर्ण क्षमतेने हॉटेल सुरू झाल्यानंतरच व्यवसायाला गती मिळेल. 

नाशिकमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातऐवजी दहा ते दहा, अशी वेळ निश्‍चित करावी. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सकाळी व सायंकाळी लवकर जेवणासाठी ग्राहक येत नाहीत. 
-संजय चव्हाण, अध्यक्ष, हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार असोसिएशन 

बारा तासांचा नियम हॉटेलचालकांना मान्य आहे. परंतु ती वेळ सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत असली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली वेळ व्यवसायासाठी उपयुक्त नाही. 
-शैलेश कुटे, व्यवस्थापकीय संचालक, हॉटेल एसएसके  

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com