यंदा टोमॅटो लागवडीत घट होण्याची शक्यता; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

tomatoes plant.jpg
tomatoes plant.jpg

नाशिक : जिल्ह्यात दर वर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामात नागपंचमीच्या दरम्यान ११ हजार हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडी केल्या जातात. मात्र एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवा, मजूर व साहित्याच्या दरात झालेली दरवाढ, तर दुसरीकडे परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी येतील की नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टोमॅटो उत्पादक कोंडीत

जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, सिन्नर, चांदवड, निफाड, इगतपुरी तालुक्यात सध्या लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र जोखीम कमी करून लागवडी करत आहेत. त्यातच हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. साधारण टोमॅटो लागवड ते काढणीदरम्यान एक लाखाच्या वर खर्च अपेक्षित असल्याचे शेतकरी सांगतात; मात्र या वर्षी खर्चाच्या २५ टक्के वाढ झाली आहे. त्यातच भांडवल उपलब्ध नसल्याने टोमॅटो उत्पादक कोंडीत सापडले आहेत. 

उत्पादन खर्चातही वाढ 

जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत ही टोमॅटोची प्रमुख बाजारपेठ आहे. तसेच गिरणारे (ता. नाशिक), पिंपळणारे फाटा (ता. दिंडोरी), ओझर (ता. निफाड) असे प्रमुख बाजार आहेत. अगोदरच येवला, निफाड, चांदवड तालुक्यातील अनेक भागात पूर्वहंगामी टोमॅटो लागवड अफवा व कोरोनामुळे घटली आहे. त्यातच नागपंचमीदरम्यान दुसऱ्या टप्प्यात होणारी टोमॅटो लागवड कमी होत असल्याची स्थिती आहे. त्यातच नाशिक परिसरात गिरणारे हे मजुरांचे केंद्र होते. मात्र वाहतूक बंद असल्याने मजूर उपलब्ध होण्यात अडचणी वाढल्या आहेत. 

विक्रीसाठी सरकारच्या प्रयत्नांची गरज 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशीच स्थिती राहिली तर काढणीपश्चात विक्री होईल का? परराज्यातून दर वर्षी येणारे व्यापारी उपलब्ध होतील का? दर वर्षीच्या तुलनेत टोमॅटो बाजार फुलणार का? अशा अनेक प्रश्नांसह शंका टोमॅटो उत्पादक उपस्थित करत आहेत. शासनाने यात लक्ष घालून दिलासा द्यावा, अशी मागणी टोमॅटो उत्पादक, निर्यातदार करीत आहेत. 

प्रमुख अडचणी 

-वाहतूक बंद असल्याने मजूर उपलब्धतेत अडचणी 
-मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने स्थानिक मजुरांकडून दरवाढ 
-कीटकनाशके व बुरशीनाशक यांच्याही दरात वाढ 
-उष्ण व दमट वातावरण असल्याने जीवाणूजन्य करपा, झांतोमोनस अशा रोगांचा प्रादुर्भाव 
-टोमॅटोसाठी प्रतिकूल वातावरण असल्याने फवारणी खर्चात वाढ 

खर्चाची तुलनात्मक साधारण स्थिती 

बाब....२०१९...२०२० 
सुतळी (प्रतिकिलो).... ६८...१०० 
तार (प्रतिकिलो)...८०...१०५ 
बांबू टोकर (नग)...२८ ...३२ 
मजुरी (प्रतिदिवस)...२५०...३५० 

टोमॅटो काढणीपश्चात विक्री हवी, जरी कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला तरी मार्केटिंग सुरळीत ठेवण्यासाठी शासकीय पातळीवरून मदत व्हावी अन्यथा शेतकऱ्यांचे अवलंबून असणारे हंगामी अर्थकारण कोलमडेल. - संतोष काश्मिरे, टोमॅटो उत्पादक, गिरणारे (ता. नाशिक) 

खरेदीसाठी तयारी आहे. आम्ही प्रामुख्याने टोमॅटो निर्यातीकामी खरेदीसाठी येतो. मात्र शासकीय पातळीवर अस्थिरता असल्याने आमच्या मनातही भीती आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार असे घटक अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने पुढाकार घ्यावा अन् आम्हाला आश्वस्त करावे, तरच या संकटात काम करता येईल. - नसीम अहमद, टोमॅटो निर्यातदार, अमरोहा (उत्तर प्रदेश) 

निर्यातक्षम टोमॅटो वाणांच्या लागवडी कमी झाल्या. एकंदरीत टोमॅटो क्षेत्र सोयाबीनमध्ये गेले. सध्या वातावरण जीवाणुजन्य आणि बुरशीजन्य रोगासाठी अनुकूल आहे. त्यामुळे कॉपरयुक्त बुरशीनाशक आणि प्रतिजैविक यांच्या वापर करावा. शेतकऱ्यांनी वेळीच तज्ज्ञांचे मार्गदर्शन करून नियंत्रण करावे. - प्रा. तुषार उगले, कीटकशास्त्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com