पान खाल्ल्यानंतर जिभेवर चुना लावून द्राक्षबागेचा व्यवहार करत 'त्याने' शेतकऱ्यांनाच लावला चुना!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

संशयित गुप्ता याने शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करीत कोट्यवधी रुपयांचा द्राक्षमाल खरेदी करताना काही प्रमाणात रोख रक्कम आणि उर्वरित मोठ्या रकमेचे धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बॅंकेत वटले नाही. त्यानंतर व्यापाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन दिवसांपासून संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तालय आणि वडनेरभैरव पोलिस ठाणे गाठत तक्रार अर्ज दाखल केला आहे.

नाशिक : (वडनेरभैरव) पान खाल्ल्यानंतर जिभेवर चुना लावून द्राक्षबागेचा व्यवहार करणारा व्यापारी, अशी ओळख असलेल्या मेवालाल सुखराम गुप्ता (रा. रोहिणीनगर, पेठ रोड, मूळ रा. बिहार) याने जिल्ह्यातील जवळपास 56 द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांनी फसवणूक करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय व वडनेरभैरव पोलिसांत तक्रार दिली. 

अशी आहे घटना

संशयित गुप्ता याने शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करीत कोट्यवधी रुपयांचा द्राक्षमाल खरेदी करताना काही प्रमाणात रोख रक्कम आणि उर्वरित मोठ्या रकमेचे धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बॅंकेत वटले नाही. त्यानंतर व्यापाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन दिवसांपासून संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तालय आणि वडनेरभैरव पोलिस ठाणे गाठत तक्रार अर्ज दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जिल्ह्यातील उमराळे, म्हसरूळ, मखमलाबाद, पिंपळगाव बहुला, दरी-मातोरी, बोपेगाव, आंबेवणी, धागूर, धोंडगव्हाणसह विविध गावांतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. संशयित व्यापारी गुप्ता हा मुळचा बिहारमधील असून, सात ते आठ वर्षांपासून नाशिकला पेठ रोड भागात वास्तव्यास आहे. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीही या व्यापाऱ्यास द्राक्षाची विक्री केली आहे. मात्र, त्याने वेळोवेळी शेतकऱ्यांना मालाचे पैसे दिले आहेत. आधी शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करीत, या व्यापाऱ्याने गेल्या महिन्यात या सर्व द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला व शेत मळ्यात, पेठ फाटा येथील घरी तसेच, पेठ रोडवरील फळ मार्केटमध्ये व्यवहार व द्राक्ष खरेदी केली. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

या व्यवहारांमध्ये ठरलेल्या रकमेपैकी केवळ 40 ते 50 हजार रुपये रोख स्वरूपात देऊन उर्वरित रकमेचे धनादेश दिले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधून धनादेश बॅंकेत टाकण्याबाबत विचारणा केली असता, धनादेश टाकू नका, तुम्हाला रोख पैसे देतो, असे आश्‍वासन गुप्ता याने दिले होते. तर, काहींनी धनादेश बॅंकेत टाकले असता ते वठलेच नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या घरी जाऊन चौकशीचा प्रयत्न केला. मात्र, घराला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From a trader in Nashik Fraud of grape growers nashik marathi news