व्यापाऱ्यांनी व्यापार वेठीस धरू नये; सेवाशुल्क पणन विभागाच्या नियमानुसारच  

योगेश मोरे
Saturday, 12 December 2020

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने धान्य व्यापारवृद्धीसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात व्यापाऱ्यांना अल्पदरात मोक्याच्या जागांवर गाळे उपलब्ध करून दिले; परंतु धान्य व्यापाऱ्यांनी या उद्देशाला हरताळ फासत बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले. सध्याही आंदोलन करून व्यापारी वेठीस धरत असल्याचा आरोप सभापती देवीदास पिंगळे यांनी केला. 

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने धान्य व्यापारवृद्धीसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात व्यापाऱ्यांना अल्पदरात मोक्याच्या जागांवर गाळे उपलब्ध करून दिले; परंतु धान्य व्यापाऱ्यांनी या उद्देशाला हरताळ फासत बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले. सध्याही आंदोलन करून व्यापारी वेठीस धरत असल्याचा आरोप सभापती देवीदास पिंगळे यांनी केला. 

पिंगळे - सेवाशुल्क पणन विभागाच्या नियमानुसारच 

पिंगळे म्हणाले, की शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात अल्पदरात गाळे उपलब्ध करून देण्यामागे बाजार समितीचा उद्देश हा व्यापारवृद्धी व्हावी हा होता. बाजार समिती धान्य व्यापारी वर्गास रस्ते, पाणी, वीज सुरक्षा, साफसफाई आदी सुविधा पुरविते. त्याअनुषंगाने बाजार समिती धान्य व्यापारी वर्गाकडून अनियंत्रित मालावर १ टक्का सेस हा बाजार समिती उपविधी तरतुदीनुसार वसूल करते. मात्र, मार्केट यार्डात येणारा धान्य माल हा शहरात येणाऱ्या मालापैकी फक्त ७ ते ८ टक्के येतो. व्यवहार सुरू असलेले ५७ गाळे, नियंत्रित-अनियंत्रित शेतमालाचा व्यवहार करणारे ७२ गाळे, तर ३० गाळे बंद असून, बऱ्याचशा गाळ्यांचा गोडाउन म्हणून वापर होतो. धान्य व्यापाऱ्याकडून वसूल होत असलेल्या सेवाशुल्कामधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पटीत बाजार समिती धान्य व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर अधिक खर्च होतो. त्यामुळेच बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

व्यापारी वेठीस धरतायत 
बाजार समिती वसूल करीत असलेले सेवाशुल्क हे पणन संचालकांनी बाजार समितीस उपविधीतील तरतुदीनुसार आहे, तसेच अनियंत्रित मालावर शेकडा एक टक्काप्रमाणे वसुलीचा अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांचे अपील फेटाळलेले आहे. पणनमंत्र्यांनीही कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे बाजार समितीचे हितावह निर्णय घेऊन संचालक मंडळाने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने अनियंत्रित मालावर शेकडा एक टक्का वसुली सुरू केलेली आहे. परंतु व्यापारी असोसिएशन याबाबत व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून वसुलीस विरोध करून तसेच व्यवहार बंद ठेवून बाजार घटकांस वेठीस धरत असल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders should not hold trade said devidas pingle nashik marathi news