गावातही आता गुळांचे "गु-हाळ" बोटांवर मोजण्या इतकेच!.वीस वर्षांपूर्वीचे चित्र काहीसे वेगळे

संदीप मोगल
Wednesday, 13 January 2021

वीस वर्षांपूर्वीचे चित्र काहीसे वेगळे होते. जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारी गुऱ्हाळे होती. या गुळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आप्तेष्टांना आमंत्रित करीत होते

लखमापूर (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्याची धरणांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. शेतीसाठी पाणी मुबलक आहे. त्यामुळे या भागात उसाचे प्रमाण चांगले असून, ऊसलागवड करणाऱ्या शेतकरीवर्गाचा ओढा साखर कारखान्याला ऊस देण्याकडे असतो. परिणामी, काही वर्षांपासून दिसून येणाऱ्या पारंपरिक गुऱ्हाळांची रंगत हरवलेली दिसत आहे. त्यामुळे सध्या दिंडोरी तालुक्यात फक्त बोटांवर मोजण्याइतकीच गूळ तयार करणारी गुऱ्हाळे पाहायला मिळत आहे. 

पारंपरिक ‘गुऱ्हाळ’ होतायत दुर्मिळ 
दिंडोरी तालुक्यात सध्याच्या मितीला जलस्रोतांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे सिंचनाचे क्षेत्रही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे उसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत अधिक आहे. अर्थात जेथे उसाचे क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी साखर कारखान्यांना ऊस पाठवितात. मागील वर्षे सोडले तर सध्या जागोजागी रसवंत्या बहरत चालल्या आहेत. त्यामुळे रसवंती चालकांकडूनदेखील उसाला मोठी मागणी आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

वीस वर्षांपूर्वीचे चित्र काहीसे वेगळे!
वीस वर्षांपूर्वीचे चित्र काहीसे वेगळे होते. जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारी गुऱ्हाळे होती. या गुळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आप्तेष्टांना आमंत्रित करीत होते. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढलेला उसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात एकसारखे टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर ठेवलेली भलीमोठी लोखंडी कढई, त्यात उसाचा रस आणि गूळभेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत सुरू असलेले काम... उसाच्या रसाने कढईत उकळी घेतली, की तयार झाला शुद्ध गावरान गूळ. सध्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथी वाल्मीक मोगल यांचे पारंपरिक गुऱ्हाळ पाहायला मिळते. त्यातली दोन बंद झाली असून, एक सेंद्रिय गुऱ्हाळ चांगल्या स्थितीत सुरू आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

सेंद्रिय गूळ बनविण्यासाठी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. ऊसतोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी कारागीर व मजूर मिळत नाही. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरीव्यतिरिक्त सर्वांना आगाऊ रक्कम अदा करावी लागते. परंतु, काहीवेळा भाव मिळत नाही. तरीही आम्ही हे गुऱ्हाळ चालवितो. -वाल्मीकराव मोगल, गुऱ्हाळमालक, लखमापूर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traditional jaggery maker are becoming rare nashik marathi news