कौतुकास्पद! आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकराला तहसिलदारांकडून मायेची ‘उभारी’; स्वखर्चाने केले उपचार

राजेंद्र दिघे 
Friday, 16 October 2020

आई बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्यास तितक्याच मायेने पुन्हा मालेगावात जाऊन विचारपूस करत काळजी घेतली. एवढ्यावरच न थांबता माणूसकीचे दर्शन घडवत चार दिवस स्वतः पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत उपचाराचा स्वतः खर्च केला.

नाशिक/मालेगाव : साचेबंद चाकरीच्या चौकटीतही दडलेला असतो माणूस अन त्याचे हळवे मन. अशा या हळव्या मनाच्या माणसाने मनावर घेतले अन तापानं फणफणलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या अनाथ चिमुरड्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली अन तो ठणठणीत झाल्याने प्रशासकीय सोपस्काराच्या पलीकडच्या ह्या संवेदनशीलतेचे सध्या कौतुक होत आहे. 

पोटच्या लेकराप्रमाणे काळजी

माळमाथ्यावरील दहिवाळ (ता. मालेगाव) येथे शासनाच्या ‘भरारी’ कार्यक्रमाच्या सर्वेक्षणानिमित्त तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी रुक्मिणीबाई पवार यांच्या कुटुंबात भेट दिली. अवघ्या नऊ वर्षांचा खूशाल पवार तापाने फणफणला होता. कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता पोलीस पाटील ईश्वर कदम यांना बोलावून या लेकराला स्थानिक खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठवले. दरम्यान प्राथमिक तपासणीनंतर खाजगी बाल रूग्णालयात दाखल केले. आई बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्यास तितक्याच मायेने पुन्हा मालेगावात जाऊन विचारपूस करत काळजी घेतली. एवढ्यावरच न थांबता माणूसकीचे दर्शन घडवत चार दिवस स्वतः पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत उपचाराचा स्वतः खर्च केला. या धावपळीत तलाठी ज्योती वाणी, सामाजिक कार्यकर्ते आबा कदम यांनी सहकार्य केले. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

गेल्या महिन्या अखेरीस ‘उभारी’ कार्यक्रम शासनाने देत २ ते ९ ऑक्टोबर कालावधीत गत पाच वर्षातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सद्यस्थिती आढावा संकलन होत आहे. याच दरम्यान दहिवाळचे आत्महत्याग्रस्त शेतकरी सुखलाल पवार यांच्या कुटुंबातील ही परिस्थिती समोर आली. पतीच्या निधनानंतर पत्नी विजया पवार यांनीही आत्महत्या केल्याने मुले अनाथ झाले. 
यामुळे वयोवृद्ध आजी नातवंडे सांभाळत आहे. 

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

कधी कधी समोरची परिस्थिती एवढी गंभीर असते.अशावेळी माणूसकी हेच नाते सक्षम ठरते.चिमुकल्याची प्रकृती बघता तात्काळ दवाखान्यात उपचार महत्त्वाचे होते. चाकोरीबाहेर असे काही केले तर समाधान मिळते. 
- चंद्रजीत राजपूत, तहसीलदार

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of a child from a suicidal farmer family at his own expense nashik marathi news