devendra fadnavis and tukaram munde.jpg
devendra fadnavis and tukaram munde.jpg

मुंढेंचे काम कसे ते देवेंद्रजींना विचारा..! 

नाशिक : माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे गाजलेल्या महापालिकेच्या सव्वा वर्षाच्या कामाचा आढावा सध्या नागपूर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतला जात असून, स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मुंढे यांची काम करण्याची पद्धत व त्यातून सुटका करून घेण्यासाठीचा मार्ग कोणता, याबाबत विचारणा होत आहे. अधिकारी, कर्मचारी त्यांच्या परीने उत्तरे देत असले तरी भाजपचेच लोकप्रतिनिधी मात्र देवेंद्रजींनाच विचारा यातून कसा मार्ग काढला, असे थेट उत्तर देऊन वेळ मारून नेत आहेत. 

नागपूरहून आलेल्या कॉलला कर्मचारी, लोकप्रतिनिधींचे उत्तर 

तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेतील कारकीर्द गाजली ती त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. देवाच्या कारणासाठी महापालिकेचा निधी वापरू देणार नाही, आमदारांच्या कामांना सार्वजनिक बांधकामऐवजी महापालिकेची परवानगी बंधनकारक करणे, महासभेपेक्षा आयुक्तांचे अधिकार अधिक असल्याची भूमिका घेणे, कर्मचाऱ्यांच्या गणवेशापासून ते कार्यालयात तंबाखू वा अन्य नशेचे सेवन न करणे, अवाजवी करवाढ, आयुक्त दौऱ्याच्या माध्यमातून तक्रारदारांनाच सुनावणे, महासभेत नगरसेवकांना न जुमानणे, धार्मिक स्थळे पाडणे, सिडकोतील 25 हजार घरांवर बुलडोझर चालविण्याची धमकी देणे, सावरकरनगर येथील ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत पाडण्यावरून न्यायालयात माफी मागणे आदी कारणांमुळे मुंढे यांची कारकीर्द गाजली. यातून "नगरसेवक व मुंढे' असा संघर्ष उभा राहिला.

"नगरसेवक व मुंढे' असा संघर्ष

कामकाजाच्या पद्धतीमुळे नागरिकसुद्धा मुंढे यांच्या विरोधात गेल्याने त्याचा फायदा घेत त्यांच्यावर अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची नाचक्की होईल म्हणून स्थानिक पातळीवर महापौरांशी चर्चा करून प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले. परंतु महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांविरोधात अविश्‍वास दाखल करण्याची वेळ आल्याने मुंढे, लोकप्रतिनिधी वाद अगदी टोकाला गेला होता. कालांतराने महिन्याभरातच मुंढे यांची बदली करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंढे यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. तेथेही मुंढे करिश्‍मा गाजत असल्याने नाशिकसह पिंपरी- चिंचवड महापालिकेचा अनुभव व त्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक पातळीवर भ्रमणध्वनीवरून विचारणा होत आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांनाच विचारा 
मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे? त्यावर कशी मात केली? या प्रश्‍नांचे एकच उत्तर दिले जाते, ते म्हणजे "देवेंद्रजींना विचारा'. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांवर एकप्रकारे रोष व्यक्त होताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com