महापालिकेचे पंचवीस टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच; अहवालातून बाब स्पष्ट

school.jpg
school.jpg

नाशिक : कोरोनामुळे राज्य शासनाने शाळा बंद ठेवल्याने महापालिकेसह खासगी शाळा व्यवस्थापनाकडून मोबाईल, व्हॉट्सॲप, दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम होत आहे. तरीही महापालिकेच्या शाळांमधील २७ हजार ७३७ पैकी सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजेच २५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत कोरोना काळात शिक्षणच पोचले नाही. ही बाब महापालिका शाळेच्या अहवालातून स्पष्ट झाली असून, शिक्षकांना यापूर्वी कोमॉर्बिड सर्वेक्षणाचे काम दिल्याचा परिणाम आहे. 

सरकारी उपक्रमांचे सर्वेक्षणही शिक्षकांच्या माथी

आता शासनाच्या 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत शिक्षकांना पुन्हा घरोघरी भेटी देण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याने ऑनलाइन शिक्षणावरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या शिरकावामुळे मार्चमध्ये देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात सर्वच आस्थापने बंद असल्याने अर्थचक्र पूर्ण थांबले. जूनपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. परंतु अद्याप शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिली नाही. जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला. महापालिकेच्या शाळाही त्यात मागे राहिल्या नाहीत. 


शिक्षण मिळत नसल्याची बाब स्पष्ट

महापालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे इयत्तानिहाय व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले. १६ जूनपासून माध्यमिक विभागातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी आठला व्हॉट्सॲपद्वारे अभ्यासक्रम दिला जात आहे. २२ जूनपासून पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कृती आधारित कार्यक्रम सुरू करण्यात आला. व्हॉट्‍सॲपबरोबरच झूम ॲप, गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला. परंतु सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याची बाब महापालिकेच्याच अहवालातून स्पष्ट झाली आहे. 

वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? 

शिक्षण विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेच्या शाळांमध्ये २७ हजार ७३७ विद्यार्थी आहेत. त्यातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नऊ हजार ८४७ विद्यार्थी समाविष्ट आहेत. टीव्हीद्वारे चार हजार ४४८ विद्यार्थी समाविष्ट आहेत. स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून सहा हजार तीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एकूण २० हजार २९८ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. परंतु उर्वरित सात हजार ४२९ विद्यार्थ्यांबाबत माहिती नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे काय, या प्रश्‍नाचे उत्तर शिक्षण विभागाकडे नाही. 

सर्वेक्षणाचा परिणाम 

महापालिकेकडे ७३५ शिक्षक आहेत, त्यातील वय वर्षे पन्नासच्या पुढील ५५ शिक्षक वगळता ६८० शिक्षकांना कोमॉर्बिड रुग्ण शोधण्याबरोबरच आता ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत घरोघरी भेटी देण्याचे काम देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्वेक्षणाचे काम बंधनकारक असताना दुसरीकडे ज्ञानार्जनाचे कर्तव्य पार पाडता येत नसल्याची शिक्षकांची खंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. 

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली हे खरे असले तरी महापालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ. - संगीता गायकवाड, सभापती, शिक्षण समिती 

महापालिकेच्या २० हजार २९८ विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न असला तरी शिक्षकांना जमेल त्याप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घरोघरी जाऊन शिकविले जात आहे. - सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com