चोरट्यांचा कारनामा! लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मारला अडीच लाखांवर डल्ला; परिसरात खळबळ

अजित देसाई
Saturday, 14 November 2020

घरात आतील लाईटदेखील सुरू होती. तर शेजारीच राहणाऱ्या शंकर सोनवणे यांचेही घराचा दरवाजा उघडा होता. हे पाहून ते पुढे सरसावले. मात्र, घराबाहेर ओट्यावर कपाटाचे ड्रॉवर पडलेले पाहून संकेत यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. 

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील घटना...दिवाळी सणाची आवरासावर करून गाढ झोपी गेलेल्या कुटुंबाला घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांना दणका दिला. वाचा सविस्तर

घराबाहेर ओट्यावर कपाटाचे ड्रॉवर पडलेले... 

संकेत बाळासाहेब सोनवणे (वय 30) हे भावासमवेत नांदुरशिंगोटे गावात सलूनचा व्यवसाय करतात. गावातच दुमजली इमारतीत दोघे भाऊ वास्तव्याला आहेत. शुक्रवारी (ता.13) दिवसभर दोघेही दुकानात काम करत होते. रात्री उशीरा ग्राहक निघून गेल्यावर त्यांनी बाजूच्या अंडाभुर्जीच्या दुकानात नास्ता करून दिवाळीनिमित्त दुकान आवरायला काढले. हे काम आटोपल्यावर पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास दोघेही घराकडे परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात आतील लाईटदेखील सुरू होती. तर शेजारीच राहणाऱ्या शंकर सोनवणे यांचेही घराचा दरवाजा उघडा होता. हे पाहून ते पुढे सरसावले. मात्र, घराबाहेर ओट्यावर कपाटाचे ड्रॉवर पडलेले पाहून संकेत यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. 

संशय खरा ठरला

घरात डोकावून पाहिले असता त्यांना वहिनी सोनाली या कॉटवर गाढ झोपेत असल्याचे दिसले. शेजारी असलेल्या कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडून आतील सामान कपडे खोलीत अस्ताव्यस्त पडलेले होते. संकेत यांनी वहिनीला आवाज देऊन जागे केले. तसेच वरच्या मजल्यावर झोपलेल्या पत्नी व आई-वडिलांना आवाज दिला. घरात शिरून चोरट्यांनी चोरी केल्याचा थांगपत्ता सोनाली यांना नव्हता. झोपेतून उठल्यावर त्या मोठ्याने रडू लागल्या. याबाबत नांदुर-शिंगोटे दूरक्षेत्रात सोनवणे यांनी माहिती दिली. पोलिस हवालदार प्रवीण अडांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

या घटनेत कपाटात ठेवलेले साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दहा हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half lakhs were stolen in the burglary nashik marathi news