दुर्दैवी! बळीराजा तुझी पदोपदी परिक्षा; दोघांनी संपविली जीवनयात्रा

deepak farmer.jpg
deepak farmer.jpg

नामपूर (नाशिक) :  शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र तोच पोशिंदा आज कुपोषित होत आहे. अशातच त्यास निसर्गही साथ देत नाही आणि सरकार ही अश्या दुहेरी कोंडीत तो सापडतो. प्रत्येकजण त्यास लुबाडण्यासाठी सज्ज असतो. बियाणे वाले लुबाडतात, खत वाले लुबाडतात आणि व्यापारी देखील लुबाडतात. या अश्या परिस्थितीमुळे त्याची खूपच बिकट अवस्था होते. त्याच्या विषयी मनात कोणालाही कणव निर्माण होत नाही किंवा खंत वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. 

दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

तळवाडे भामेर पोचकालव्यासाठी दिलेल्या जमिनीचा न मिळालेला मोबदला, नापिकी, कर्जबाजारीपणा, राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज, शेतमालाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून दरेगाव येथील शेतकरी प्रकाश पवार, तर बहिराणे (ता. बागलाण) येथील दीपक धोंडगे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. 

पाठपुरावा करूनही जमिनीचा मोबदला नाहीच

दरेगाव (ता. बागलाण) येथील शेतकरी प्रकाश रामदास पवार (वय ५३) यांनी तळवाडे भामेर पोचकालव्यासाठी दिलेल्या जमिनीचा न मिळालेला मोबदला, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून शेतातच मंगळवारी (ता.३) सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. प्रकाश पवार यांची एक हेक्टर ३४ आर एवढी वडिलोपार्जित शेती होती. हरणबारी धरणातून तळवाडे भामेर पोचकालव्याच्या चारी क्रमांक आठसाठी आठ वर्षांपूर्वी त्यांची सुमारे २० आर जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना शासनाकडून अधिग्रहित जमिनीचा मोबदलादेखील मिळाला. परंतु अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही कालव्याच्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा कांद्याचे महागडे बियाणे खरेदी करून बोगस हवामानामुळे कांद्याची रोपे खराब होऊन शेतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र, हातउसनवार आणलेले असे कर्जे असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

कुटुंबीयांनी अशा अवस्थेत पहिल्यानंतर फोडला हंबरडा
पवार दरेगाव शिवारातील शेतात घर करून राहतात. त्यांचे शेजारी शेतात पाहणी करत असताना आत्महत्येची घटना लक्षात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी अशा अवस्थेत पहिल्यानंतर हंबरडा फोडला. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले. सामाजिक कार्यकर्ते दत्तू पवार, प्राथमिक शिक्षक जगदीश पवार, राहुल पवार, दिनेश पवार आदींनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पोलिसपाटील पुंडलिक चव्हाण यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जायखेडा पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सुनील पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ हेंद्रे यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्याच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. 

बहिराणे येथे तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास 
बहिराणे (ता.बागलाण) येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणा, राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज, शेतमालाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून आपल्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दीपक शिवमन धोंडगे (वय ३६) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक धोंडगे यांची ८२ आर वडिलोपार्जित शेती होती. दीपकच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वावलंबी बनविले. आईने दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर दोन्ही मुलांना शेतीची वाटणी करून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून शेतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने धोंडगे कुटुंबीयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. तसेच यंदाही महाग दराने खरेदी केलेल्या कांद्याच्या बियाणे पूर्णपणे खराब झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँक, हातउसनवार आणलेले असे लाखो रुपयांचे कर्जे असल्याचे नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब अहिरे, सरपंच भाऊसाहेब धोंडगे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, मंडळ अधिकारी सी पी अहिरे, तलाठी श्री. आवाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दीपकच्या मागे वृद्ध आई, भाऊ असा परिवार आहे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com