शहर बससेवेवरून भाजपमध्ये दोन गट; गटनेत्यांच्या विरोधानंतर महापौरांकडून समर्थन

विक्रांत मते
Sunday, 18 October 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली ही सेवा आताच का नकोशी वाटली, असा सवाल करताना आधीच उपरती झाली असती, तर महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाचला असता अशी टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.  ​

नाशिक : कोरोनाचे निमित्त साधून राज्य परिवहन महामंडळाकडून एकीकडे बससेवेला कायमचा लाल कंदील दाखविण्याची तयारी सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेने बससेवा सुरू करू नये, अशी मागणी केली. त्यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र शहर बससेवा सुरू झालीच पाहिजे, असा पवित्रा घेतल्याने भाजपमध्ये बससेवेवरून दोन गट तयार झाले आहेत. 

महापौरांकडून समर्थन 

राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा बंद करून त्याऐवजी महापालिकेने सेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. बस चालविण्याचे कंत्राट देतानाच वाहक व तिकीट वसुलीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु बससेवा सुरू करताना अनेक तांत्रिक अडचणी समोर येत आहेत. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाने बससेवा बंद केली. हेच निमित्त पुढे करून बससेवा कायमची बंद करण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाचा आहे. महामंडळाच्या भूमिकेला भाजपचे गटनेते पाटील यांनी विरोध केला. 

पाणीपुरवठ्याप्रमाणेच शहर बससेवा अत्यावश्यक बाब

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने परिवहन महामंडळानेच बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणी करत महापालिकेच्या बससेवेला विरोध केला. मात्र महापौर कुलकर्णी यांनी महापालिकेच्या बससेवेचे समर्थन केले. पाणीपुरवठ्याप्रमाणेच शहर बससेवा अत्यावश्यक बाब आहे. शहरात आजही अनेक नागरिक असे आहेत, की त्यांच्याकडे वाहने नाहीत. त्यांच्यासाठी बससेवा महत्त्वाची असल्याने बससेवा सुरू केली जाणार असल्याचेही महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

भाजपला उशिराने सुचलेले शहाणपण 

शहर बससेवेवरून भाजपमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शहर बससेवेसंदर्भात भाजपला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याचे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली ही सेवा आताच का नकोशी वाटली, असा सवाल करताना आधीच उपरती झाली असती, तर महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाचला असता अशी टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two groups in BJP from city bus service nashik marathi news