नाशिकमधून पाच महिन्यांत 'इतक्या' कांद्याची निर्यात; उन्हाळ कांद्याच्या भावातही रुपयांनी वाढ

महेंद्र महाजन
Thursday, 10 September 2020

जिल्ह्यातून गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत २६ हजार ७३४ टन कांद्याची निर्यात झाली होती. यंदा एक लाख ९२ हजार १२३ टन कांद्याची निर्यात झाली आहे. मध्यंतरी क्विंटलचा भाव ७०० ते ९०० रुपये असताना निर्यातवृद्धीला चालना मिळाली आहे.

नाशिक : जिल्ह्यातून गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत २६ हजार ७३४ टन कांद्याची निर्यात झाली होती. यंदा एक लाख ९२ हजार १२३ टन कांद्याची निर्यात झाली आहे. मध्यंतरी क्विंटलचा भाव ७०० ते ९०० रुपये असताना निर्यातवृद्धीला चालना मिळाली आहे. याखेरीज २४ तासामध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात १०० ते ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आज उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी दोन हजार १०० ते दोन हजार ४५१ रुपये असा भाव मिळाला आहे. 

उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलला १०० ते ३५० रुपयांनी वाढ 
देशांतर्गत आणि निर्यातीसाठी वाढलेल्या मागणीमुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. दक्षिणेतील ‘अर्ली’ कांद्याचे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याने जिल्ह्यातील चाळीतील उन्हाळ कांद्याला मागणी वाढण्यास सुरवात झाली. मध्य प्रदेशात बंद असलेल्या बाजारपेठांमुळे देशांतर्गत ग्राहकांसाठी नाशिकच्या कांद्याला पसंती मिळाली. पावसाने पोळ (खरीप) कांद्याच्या रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले असल्याने यंदा हा कांदा बाजारात येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे सारी मदार उन्हाळ कांद्यावर असेल. पण दुसरीकडे मात्र सततच्या पावसामुळे चाळीतील कांदा आर्द्रता धरून त्यास पाणी सुटून नुकसान वाढले आहे. त्यामुळे भावाची स्थिती लक्षात घेऊन चाळीतील कांदा पुढील दोन महिने कितपत टिकणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

नवीन कांदा बाजारात येण्यास आणखी १५ दिवसांचा कालावधी
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नवीन कांदा बाजारात येण्यास आणखी १५ दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत चाळीतील कांद्याच्या भावात फारशी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र पाऊस कायम राहिल्यास आणि दक्षिणेतील कांद्याच्या नुकसानीत भर पडल्यास पोळ कांदा बाजारात येईपर्यंत चाळीतील उन्हाळ कांद्याखेरीज दुसरा पर्याय देशाप्रमाणेच अरब राष्ट्र आणि दुबई, मलेशिया, बांगलादेश, सिंगापूरच्या ग्राहकांना नसेल. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ
 उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ बुधवार (ता. ९) मंगळवार (ता. ८) 
येवला २ हजार ४०० १ हजार ९०० 
नाशिक २ हजार १०० १ हजार ८५० 
लासलगाव २ हजार ३५० २ हजार १०१ 
कळवण २ हजार ३०० २ हजार २०० 
मनमाड २ हजार ३५० २ हजार ५० 
सटाणा २ हजार ४२५ २ हजार १३५ 
पिंपळगाव २ हजार ४५१ २ हजार १५० 
दिंडोरी २ हजार १०० १ हजार ७५१ 
देवळा २ हजार ३०० २ हजार 
उमराणे २ हजार ३०० २ हजार 
नामपूर २ हजार २५० २ हजार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh tonnes of onion exported from Nashik marathi news