"खासगी डॉक्‍टरांच्‍या प्रश्‍नांबाबत आठवडाभराचा अल्टिमेटम; अन्‍यथा कामबंद आंदोलन"  

अरुण मलाणी
Wednesday, 16 September 2020

"वेळोवेळी विविध बाबी निदर्शनास आणूनही शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना विश्वासात न घेता, एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. आगामी आठवडाभरात शासनाने डॉक्‍टरांच्‍या मागण्यांबाबत लक्ष न घातल्‍यास खासगी डॉक्‍टर कामबंद आंदोलन पुकारतील"

नाशिक : एकीकडे ऑक्‍सिजन, औषधांच्‍या दरांबाबत कुठलेही नियंत्रण नाही, तर दुसरीकडे कोरोनाच्‍या उपचाराबाबत कॅपिंग केले जात आहे. नॉन-कोविड उपचारांसाठी नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीचा हस्‍तक्षेप वाढत आहे. वेळोवेळी विविध बाबी निदर्शनास आणूनही शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना विश्र्वासात न घेता, एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. आगामी आठवडाभरात शासनाने डॉक्‍टरांच्‍या मागण्यांबाबत लक्ष न घातल्‍यास खासगी डॉक्‍टर कामबंद आंदोलन पुकारतील, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी जाहीर केली आहे. 

शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना विश्र्वासात न घेता निर्णय
मंगळवारी (ता. १४) ऑनलाइन झालेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी विविध मुद्द्यांची माहिती दिली. डॉ. चंद्रात्रे म्‍हणाले, की राज्‍यस्‍तरावरील पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्‍या कुचकामी धोरणामुळे जनरल प्रॅक्टिशनर्सला कोरोनाची लागण होत असल्‍याने त्‍यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. नॉन-कोविड उपचारावरही नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीतर्फे लेखापरीक्षणाचा अट्टाहास डॉक्‍टरांचे खच्चीकरण करणारा आहे. जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्‍ट) दराचा प्रश्‍न प्रलंबित आहे. ऑक्सिजन, औषधे यांच्‍या दरावर कुठलेही कॅपिंग नसताना, केवळ उपचारावर निर्बंध आणून डॉक्‍टरांना आरोपी ठरविण्याचे प्रकार त्‍वरित बंद झाले पाहिजेत, अशी संघटनेची भूमिका आहे. 

शासनाने रुग्‍णालये चालवायला घ्यावीत 
पाठपुराव्‍यानंतरही शासनाकडून खासगी डॉक्‍टरांच्‍या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आता परिणामांचा विचार न करता ठोस भूमिका घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. खासगी रुग्‍णालये शासनाने चालवायला घ्यावीत, सर्व व्‍यवस्‍थापन सांभाळावे, कर्मचाऱ्यांचा पगार करावा, आम्‍हीही शासनाच्‍या आधिपत्‍याखाली नोकरीच्‍या रूपाने सेवा देण्यास तयार आहोत, असे खुले आव्हान डॉ. चंद्रात्रे यांनी दिले. दरम्‍यान, आंदोलनाच्‍या पार्श्र्वभूमीवर रुग्‍णालात नव्‍याने रुग्‍ण दाखल करून घ्यायचे का, याबद्दल विचारविनिमय सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमधील प्रादुर्भाव लक्षात घेता, चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्‍याचेही डॉ. चंद्रात्रे यांनी स्‍पष्ट केले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संघटनेतर्फे मास्‍क मस्‍ट मोहीम 
यापूर्वी आयएमएतर्फे षटसूत्री जाहीर केली होती. यातील सूचनांचे काटेकोर पालन झाले, तर कोरोनाचा इतक्‍या मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नसता. सध्याची परिस्‍थिती लक्षात घेता मास्क मस्‍ट ही मोहीम राबविली जाते आहे. महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त, जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र देत प्रत्‍येकाला मास्‍कचा सक्‍तीने वापर करण्यासंदर्भात विनंती केली जाणार आहे. मास्‍क न वापरणाऱ्यांवर अधिक कठोरपणे कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्‍याचेही श्री. चंद्रात्रे यांनी सांगितले.  
हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ultimatum on questions from private doctors nashik marathi news