हॉटेलसाठी तळघर, टेरेसचा अनधिकृत वापर; अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कानाडोळा

विक्रांत मते
Friday, 23 October 2020

कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सर्वाधिक फटका पर्यटन व हॉटेल व्यवसायाला बसला असला, तरी आता नव्याने हॉटेल सुरू करताना थेट इमारतीच्या तळघर व टेरेसवर व्यवसाय सुरू करून कमाई करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू झाले आहेत.

नाशिक : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सर्वाधिक फटका पर्यटन व हॉटेल व्यवसायाला बसला असला, तरी आता नव्याने हॉटेल सुरू करताना थेट इमारतीच्या तळघर व टेरेसवर व्यवसाय सुरू करून कमाई करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू झाले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मात्र सोईस्कर कानाडोळा केला जात आहे. 

हॉटेलसाठी तळघर, टेरेसचा अनधिकृत वापर
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र यात गर्दीची ठिकाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. गेल्या महिन्यात हॉटेल, रेस्टॉरंट व बार खुले करण्यास परवानगी देण्यात आली. सात महिन्यांनंतर मिळालेल्या परवानगीमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू असल्याने ठराविक अंतरावर ग्राहकांना बसविले जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे व्यवसाय होत नसल्याची तक्रार केली जात आहे. काही व्यावसायिकांकडून व्यवसायाची नवी शक्कल लढविताना थेट टेरेस व तळघरामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आल्याने या नियम उल्लंघनाकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. ऑनलाइन व लेखी तक्रार करूनही कोरोनाच्या नावाखाली दखल घेतली जात नसल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाचा कानाडोळा चिरीमिरीच्या संशयाकडे वळताना दिसत आहे. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

कारवाईचे कागदी घोडे 
काही वर्षांपूर्वी मुंबईतील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत १४ जणांचा मृत्यू, तर ५५ लोक जखमी झाले होते. त्यानंतर शहरात अनधिकृतपणे तळघर, टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेलचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नगररचना, अतिक्रमण व अग्निशमन दलाने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात ३२४ इमारतींच्या तळघर व टेरेसचा व्यावसायिक कारणासाठी अनधिकृत वापर सुरू असल्याचे समोर आले होते. इमारतींच्या तळघरांमध्ये ११८ गुदामे, ४६ हॉटेले, १५२ दुकाने व ५३ इतर वाणिज्य आस्थापनांचा वापर सुरू असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद होते. त्यानंतर नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाने या आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर कारवाईचे फक्त कागदी घोडे नाचविले गेले. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आढावा घेऊन कारवाई करू. -विजय पगार, अतिक्रमण उपायुक्त, महापालिका 

 

विभागनिहाय मिळकतींचा अनधिकृत वापर 
विभाग गुदामे हॉटेल दुकाने इतर व्यवसाय 

नाशिक रोड २३ २० ४१ ०९ 
नाशिक पूर्व २८ ०९ ३२ ११ 
सिडको व सातपूर १२ ०४ ०३ ०२ 
नाशिक पश्‍चिम १६ ०५ ४६ ०६ 
पंचवटी विभाग ३९ ०८ ३० २५ 
एकूण ११८ ४६ १५२ ५३ 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized use of basement terrace for hotel nashik marathi news