बोगद्याच्या तलावापेक्षा रेल्वे फाटक परवडले; भुयारी मार्ग ग्रामस्थांसाठी ठरतोय डोकेदुखी

संतोष विंचू
Wednesday, 23 September 2020

बोगदे पाण्याने भरल्याने भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील धामोडा, अनकुटे, पिंपळगाव जलालच्या येथील बोगद्यांची प्रत्येक पावसाळ्यात तरण तलाव आणि विहिरी होत आहेत. त्यामुळे बोगद्यापेक्षा फाटक परवडले, अशी संतप्त भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. 

नाशिक/येवला : (नगरसूल) रेल्वे फाटकांची संख्या कमी करण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी भूमिगत बोगदे करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने हाती घेतला आहे. पण पावसाळ्यात हे बोगदे पाण्याने भरल्याने भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील धामोडा, अनकुटे, पिंपळगाव जलालच्या येथील बोगद्यांची प्रत्येक पावसाळ्यात तरण तलाव आणि विहिरी होत आहेत. त्यामुळे बोगद्यापेक्षा फाटक परवडले, अशी संतप्त भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. 

ग्रामस्थांची सोय कागदावरच...

मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले आणि येवला-नांदगाव प्रमुख राज्यमार्ग सातवरील नगरसूल रेल्वेच्या स्थानकानजीकचा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने धामोडे गावाजवळ नगरसूल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने वाहतुकीसाठी बोगदा केला आहे. परंतु पावसाळ्यात या बोगद्यात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने येथे तरण तलाव तयार झाला आहे. परिणामी, ग्रामस्थांना दहा ते १५ किलोमीटर दूरवरून पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे गेट बंद करून त्याऐवजी बोगदा केल्याने ग्रामस्थांची सोय कागदावरच दिसत आहे. 

बोगदे वाहतुकीसाठी कूचकामी ठरल्याने अनेक समस्या

असाच प्रकार अनकुटे येथील रेल्वे गेट क्रमांक ८० बंद करून, खालून बोगदा (अंडरपास) तयार करण्यात आला आहे. हा रस्ता दर वर्षी पावसाळ्यात पाण्याने भरलेला असल्याने शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना व वाहतूकदारांना अडचणी निर्माण होत आहेत. पिंपळगाव जलाल येथील बोगदाही पाण्यात गेल्याने पिंपळगावसह उंदीरवाडी, अंदरसूल परिसरातील ग्रामस्थांना मिळेल तो पर्यायी मार्ग शोधावा लागतोय. रेल्वे प्रशासनाने तयार केलेले सर्वच बोगदे वाहतुकीसाठी कूचकामी ठरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

नगरसूलचा बोगदा अडथळ्याचा 

येवला ते नांदगाव राज्य मार्ग क्रमांक २५ वर नगरसूल येथे मनमाड-नांदेड रेल्वे मार्गावर मुख्य रेल्वे गेट बंद करून नव्याने कोट्यवधींचा निधी खर्चून अंडरपास काम केले जात आहे. या मार्गामुळे ३५ गावांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहेे. दिवसभर या ठिकाणी वाहनाची रीघ लागलेली असते. मात्र येथे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम होत असून, बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर जागेवरच वळण दिले आहे. भविष्यात अपघात होण्यासह वाहतुकीच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. येथेही पाणी तुंबण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाकडे चूक सुधारण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

रेल्वे प्रशासनाकडून येवला-नांदगाव प्रमुख राज्य महामार्गावर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, महत्त्वाच्या राज्य महामार्गावर बोगद्याने रस्त्याचा दर्जा खालवला आहे. पावसाळ्यात या बोगद्यात प्रचंड पाणी साचत आहे. रेल्वे प्रशासनाने वेळेतच या मार्गावरील भुयारी मार्गात सुधारणा करावी. -प्रसाद पाटील, माजी सरपंच, नगरससूल 

काम सुरू असल्याने आताच नगरसूलच्या रेल्वे बोगद्याची तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. तर धामोडा, अनकुटे या गावांना जोडणारे रस्ते बंद होणे गंभीर असून, रस्त्याअभावी दवाखान्यात उपचारासाठीसुद्ध या भागातील नागरिकांना जाता येत नाही. लोकप्रतिनिधिंनी दखल घ्यावी. - विनोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, नगरसूल 

तीन-चार वर्षांपासून पिंपळगाव जलालच्या बोगद्याच्या आम्ही तक्रारी करतोय. थोडा पाऊस पडला तरी येथे पाणी तुंबते. चार-पाच दिवसांनी ते उपसले जाते. तोपर्यंत मोठा वळसा घालून गावात जावे लागते. यासंदर्भात सुधारणा न झाल्यास आम्ही याचिका दाखल करणार आहोत. - ॲड. समीर देशमुख, अध्यक्ष, तालुका काँग्रेस 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underground traffic is a headache for citizen in yeola nashik marathi news