राष्ट्रीय एकात्मतेला मालेगावकरांकडून चार चाँद! कोरोना आपत्तीतही हिंदू-मुस्लिमांकडून एकत्रित अंत्यसंस्कार

malegaon3.jpg
malegaon3.jpg

नाशिक : (मालेगाव) २००१ च्या दंगलीनंतर शहराची असलेली 'संवेदनशील' अशी प्रतिमा नामशेष होऊन गेल्या दीड दशकात २००६ व २००८ मधील दोन बाँबस्फोटांच्या आपत्तीत राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागून आता कोरोनाच्या आपत्तीमध्ये तिला उभारी मिळाल्याचा प्रत्यय दररोज शहरात येत आहे. 

हिंदू-मुस्लिम डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांकडून अविरत सेवा 

शुक्रवारी (ता. २५) शहरातील मंडप व्यावसायिक सुभाष कोठावदे (वय ३८) यांचे कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर निधन झाल्यामुळे त्यांच्यावरील अंत्यसंस्काराची जबाबदारी मुक्तार अहमद अमीन अन्सारी (रा. आयेशानगर) व मोहम्मद रईस अन्सारी (रा. पवारवाडी) यांनी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे पार पाडली. या दोघांसह पाच जणांच्या पथकाने शंभरपेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यांतील काही हिंदू, तर काही मुस्लिम बांधव होते. २००६ च्या बाँबस्फोटातील जखमी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी रक्तदान, पश्‍चिमेच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर तहान-भूक हरपून केलेले उपचार ध्यानात ठेवून आज शहराच्या पश्‍चिम भागात कोरोना रुग्णसंख्या पाचशेपेक्षा अधिक झाल्याने पूर्व भागातील डॉ. परवेज फैजी, डॉ. इकबाल मणियार, डॉ. वासिफ अन्सारी, डॉ. अम्मार अन्सारी, डॉ. सौद अन्सारी, डॉ. शाहीद अख्तर, डॉ. शोएब अहमद, डॉ. आमीर सिराज, डॉ. आसिफ अन्सारी, डॉ. सुफियान अख्तर, डॉ. अनिस मेहमूद, डॉ. इम्रान अन्सारी, डॉ. खुर्शीद अन्सारी, डॉ. झिशान शेख आदी मुस्लिम डॉक्टर रात्र, पहाट न पाहता अत्यल्प दरात या रुग्णांवर मोठ्या हिमतीने उपचार करून जणू त्याची परतफेड करीत आहेत. 

समाजापुढे वेगळाच आदर्श

बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी अनेक रुग्णांना पूर्व भागातील या डॉक्टरांकडे उपचारासाठी पुढाकार घेऊन नेले. पश्‍चिम भागातील नगरसेवकही रुग्णांना धीर देतानाच पूर्वेकडील या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. एप्रिल व मेमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढली असताना डॉ. हितेश महाले, डॉ. संदीप खैरनार, डॉ. योगेश पाटील व डॉ. स्वप्नील यांनी कोरोनाबाधितांवर न घाबरता उपचार केले. कॅम्प भागातील मुश्‍ताक, आसिफ कुरेशी या मंडप व्यावसायिकांनी कोरोना लॉकडाउनच्या काळात दोन लाख रुपयांचे धान्यवाटप करून वेगळा आदर्श घातला. शेख रेहान व इरफान कुरेशी या शैक्षणिक क्षेत्रातील जोडगोळीने याच काळात किराण्यासह रमजानचा सण पाहून सुकामेवा वाटप केल्याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या. 

शहरातील हिंदू-मुस्लिम एकोप्याला बळ...

शहरातील हिंदूबहुल पश्‍चिम भागात रोज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू होतोय. मुक्तार, रईस, इमरान अन्सारी, चेतन देवरे, सद्दाम शेख हे रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांचे पाच जणांचे पथक कोरोनाबळींवर अंत्यसंस्काराची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. सुभाष यांच्या अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार मुक्तार व रईस यांनी करून सुभाष यांच्या मृतदेहाला त्यांच्या आठवर्षीय चिमुकल्या स्वामीने अग्निडाग दिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. या वेळी मुश्‍ताक कुरेशी, अनिल खर्जे यांच्यासह मोजकीच उपस्थिती होती. यामुळे मात्र शहरातील हिंदू-मुस्लिम एकोप्याला बळ मिळत आहे. 

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्कारातून मन:शांती व चांगल्या कामाचे समाधान मिळते. अनेक मृतांच्या नातेवाइकांना आम्ही दफनविधीचे साहित्यही आणून दिले. या वेळी गरीब रुग्णांच्या अंत्यसंस्कार साहित्यासाठी पैशांची व्यवस्था केली. आजपर्यंत ८० हून अधिक कोरोना मृतांवर आमच्या पाच जणांच्या पथकाने अंत्यसंस्कार केले. सलग सात महिने कोरोना रुग्णांमध्ये वावरत असतानाही कोरोनाची बाधा झाली नाही ही अल्लाहची मेहरबानी आहे. - मुक्तार अमीन अन्सारी, रुग्णवाहिकाचालक, मालेगाव  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com