सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानांचा अनोखा उपक्रम; पंचक्रोशीत होतंय कौतुक

रोशन खैरनार
Sunday, 3 January 2021

मोरेनगर (ता. बागलाण) येथील सैन्यदलात सेवेत असलेल्या नऊ भूमिपुत्र जवानांनी सध्या गावी सुटीच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था नसलेल्या गावातील सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचे मोफत शिकवणी वर्ग सुरू करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सटाणा (नाशिक) : मोरेनगर (ता. बागलाण) येथील सैन्यदलात सेवेत असलेल्या नऊ भूमिपुत्र जवानांनी सध्या गावी सुटीच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था नसलेल्या गावातील सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचे मोफत शिकवणी वर्ग सुरू करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जवानांकडून देशसेवेसोबत आता भविष्याची पिढी घडविण्याचे सामाजिक कर्तव्यही पार पाडले जात असल्याने त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मोरेनगर गावात लष्करी जवानांनी भरवली शाळा 

मोरेनगर गावातील २५ युवक सैन्यदलात सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असून, त्यातील हेमराज बागूल, पंकज मोरे, देवीदास देवरे, यशवंत मोरे, सूरज मोरे, सतीश मोरे, गिरीश वाघ, तुषार मोरे हे सध्या सुटीवर गावी आहेत. कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शिक्षणव्यवस्था ऑनलाइन झाली आहे. मात्र सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्वतंत्र मोबाईल व संगणक विकत घेणे शक्य नसल्याने गावी सुटीवर आलेल्या या नऊ जवानांनी आपला संपूर्ण वेळ या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी देण्याचे ठरविले. त्यांनी स्वयंस्फूर्तीने गावातील प्राथमिक शाळेची संपूर्ण स्वच्छता केली आणि विद्यार्थ्यांना दररोज आपल्या घरी अध्यापन सुरू केले आहे. 

आपल्या सुटीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी

लष्करी जवान म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर सीमेवर लढणारा जवान येतो. त्याग, शौर्य आणि विजय यांचे एकमेव उदाहरण म्हणजे भारतीय सैनिक. ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्तींसोबत मैत्री करत सीमेवर संकटाच्या काळात डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशसेवा करणाऱ्या जवानांना मिळणारी सुटी परिवारासोबत घालविणे हे गरजेचे असते. मात्र या जवानांनी आपल्या सुटीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करून सामाजिक कर्तव्यही पार पाडले आहे. 

विद्यार्थ्यांना लेखनसाहित्यही वाटप

कोरोनाकाळात या जवानांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत बागलाण पंचायत समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख एम. एस. भामरे यांनी सर्व जवानांना सन्मानित केले. या वेळी जवानांनी विद्यार्थ्यांना लेखनसाहित्यही वाटप केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक नारायण सोनवणे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार, प्रतिभा अहिरे, वैशाली पवार आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ सामाजिक अंतर राखून उपस्थित होते. 

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

जवानांचे गाव अशी ओळख असणाऱ्या मोरेनगर गावातील जवानांनी सुटीवर असताना आपला महत्त्वाचा वेळ कुटुंबासोबत घालविणे स्वाभाविक होते. मात्र त्यांनी कोरोनामुळे शाळेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले. त्यांच्या ज्ञानदानाचा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात अनोखा व प्रेरणादायी आहे. - सोपान खैरनार, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त 

हेही वाचा>  दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique initiative of soldiers on holiday is appreciated everywhere nashik marathi news