अवकाळीने द्राक्षपंढरीत आर्थिक संकट; खराब झालेली द्राक्षे बांधावर टाकण्याची नामुष्की 

माणिक देसाई
Monday, 11 January 2021

निफाड तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षपंढरीतील काढणीला आलेल्या द्राक्षबागांना तडे गेल्याने बळीराजाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

निफाड (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षपंढरीतील काढणीला आलेल्या द्राक्षबागांना तडे गेल्याने बळीराजाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

संपूर्ण जगभरात आपल्या अवीट गोडीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या निफाडच्या द्राक्षांना दृष्ट लागली आहे. तालुक्यात २५ हजारांहून अधिक हेक्‍टरवर द्राक्षाचे पीक घेतले जाते. मात्र, काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका द्राक्षाला बसत आहे. २०१६ मध्ये दुष्काळाची परिस्थिती, त्यानंतर नोटाबंदी, २०१९ चे कोरोनाचे संकट यातूनही सावरत बळीराजाने मोठ्या हिमतीने द्राक्षबाग उभी केली. परंतु या द्राक्षबागांना अवकाळीने गाठलेच. द्राक्षमण्यांना तडे जाऊन संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. 

पंचनामे करण्याची मागणी 

गोदाकाठ भागातील भेंडाळी, औरंगपूर, म्हाळसाकोरे, करंजगाव, चांदोरी, सायखेडा, कसबे सुकेणे, ओझर, दिक्षी, खेरवाडी, पिंपळगाव बसवंत, पालखेड, नैताळे, उगाव, खेडे, शिवडी आदी भागातील द्राक्षबागांना अवकाळीची धग पोचली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बळीराजाला मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

चार वर्षांपासून दुष्काळ, नोटबंदी आणि कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच अवकाळीच्या तडाख्यात आमच्या द्राक्षबागा सापडल्या आहेत. यातून कसे सावरायचे, हेच समजत नाही. प्रशासनाने पंचनामे करून मदत द्यायला हवी. 
-रावसाहेब चौधरी, शेतकरी, दिक्षी 

अवकाळीने होत्याचे नव्हते केले आहे. सोन्यासारखी पिकवलेली द्राक्षे एका झटक्यात मातीमोल झाली. संपूर्ण वर्षभराचे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने कुटुंबकबिला कसा चालवायचा, याची चिंता सतावत आहे. ऊन पडल्यानंतर त्याची तीव्रता अधिक जाणवणार आहे. 
-विलास संगमनेरे, शेतकरी, खेरवाडी 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

अवकाळी पावसाने विक्रीला तयार झालेल्या अर्ली द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या हंगामात कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आता अवकाळीने यंदाचा हंगामही गेला. त्यामुळे सर्व बाजूंनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने भरीव मदत करावी. 
-संजय साठे, शेतकरी, नैताळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseasonal rains at Niphad caused a loss of crores of rupees to the grape crop nashik marathi news