esakal | नाशिकच्या वाहन विक्रीस लॉकडाऊनचा फटका; यंदा तुलनेने २६ हजार वाहनांची घट 

बोलून बातमी शोधा

Vehicle sales in Nashik}

गतवर्षी कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा वाहन विक्रीलाही फटका बसला. एप्रिल २०१९ ते २०२० दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ८१ हजार ४६ वाहनांची नोंद झाली, तर एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ यादरम्यान ५५ हजार २१५ वाहनांची नोंद झाली

नाशिकच्या वाहन विक्रीस लॉकडाऊनचा फटका; यंदा तुलनेने २६ हजार वाहनांची घट 
sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : गतवर्षी कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा वाहन विक्रीलाही फटका बसला. एप्रिल २०१९ ते २०२० दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ८१ हजार ४६ वाहनांची नोंद झाली, तर एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ यादरम्यान ५५ हजार २१५ वाहनांची नोंद झाली. तब्बल २६ हजार वाहनांची घट झाली. तथापि, गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारीत एक हजार ८२६ वाहनांची नोंदणी वाढली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली. 

कोरोनामुळे मे २०२० ते डिसेंबर २०२० यादरम्यान सुमारे २५ हजार ८३१ वाहनांची घट झाली. २०२१ या नवीन वर्षात केवळ जानेवारीत गत जानेवारीच्या तुलनेत एक हजार ८२६ वाहनांची वाढ झाली. जानेवारी २०२१ मध्ये नऊ हजार ४५९ वाहनांची नोंद झाली होती. तर, या वर्षी जानेवारीत ११ हजार २८५ नव्या वाहनांची नोंद झाली. या वर्षी जानेवारीत जवळपास आठ हजार ६१४ नव्या दुचाकी, तर एक हजार ५६६ चारचाकी, ९८ रिक्षा, दोन रुग्णवाहिका, ३८५ ट्रक, १३ टँकर, १७ थ्री व्हीलर, ४१५ ट्रॅक्टर, ११५ शेतीपयोगी वाहने, तर ५० इतर वाहनांची नोंद झाली. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल


रिक्षा, ट्रकच्या विक्रीत घट 

जानेवारी २०२० च्या तुलनेत २२६ रिक्षांची घट झाली असून, मिनी बस, स्कूल बस, थ्री व्हीलर या वाहनांच्या विक्रीतही घट झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत १७० ट्रक आणि २० थ्री व्हीलरमध्ये घट झाली आहे, तर ७७ ट्रॅक्टर, १३ शेतीपयोगी वाहने आणि ४१ इतर वाहनांमध्ये वाढ झाली आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आकर्षक नोंदणी क्रमांकातून दोन कोटी ४१ लाख ५१ हजार 

आकर्षक नोंदणी क्रमांकाच्या माध्यमातूनदेखील मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहन विक्रीत काही प्रमाणात घट झाली असली तरी आकर्षण नोंदणी क्रमांकातून चांगला महसूल मिळाला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान जवळपास दोन कोटी ४१ लाख ५१ हजारांचा महसूल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाला आहे. एप्रिलमध्ये ८४ हजार, मेमध्ये एक लाख ९५ हजार, जून- १६ लाख १२ हजार, जुलै- ११ लाख ९२ हजार, ऑगस्ट- १५ लाख २८ हजार, सप्टेंबर- २९ लाख ७५ हजार, ऑक्टोबर- ५३ लाख पाच हजार, नोव्हेंबर- ६१ लाख दोन हजार आणि डिसेंबरमध्ये ५१ लाख ५८ हजार महसूल मिळाला आहे. या वर्षी वाहन विक्रीत चांगली वाढ होत असल्यानेही आकर्षक क्रमांकाच्या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त होईल.