गुलाल आमचाच…स्टेट्स झळकले अन्‌ घालमेलही वाढली! आता प्रतीक्षा निकालाची

संतोष विंचू 
Friday, 15 January 2021

हा आला, तो रहायला, त्याला गाडी पाठवा, तो काय येईना... त्यांचं काय राहिलं असेल ते पहा...समर्थकांना अशा सूचना देत उमेदवारांची दिवसभर मतदारांना आणण्यासह मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एकच लगबग सुरू होती. तालुक्यात सर्वत्र मतदानाला प्रतिसाद मिळाला.

येवला (जि.नाशिक) : हा आला, तो रहायला, त्याला गाडी पाठवा, तो काय येईना... त्यांचं काय राहिलं असेल ते पहा...समर्थकांना अशा सूचना देत उमेदवारांची दिवसभर मतदारांना आणण्यासह मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एकच लगबग सुरू होती. तालुक्यात सर्वत्र मतदानाला प्रतिसाद मिळाला.

हजार ते पाच हजाराची फुली आणि कुठे मंगळसूत्राचे मनी चमत्कार करून गेले. शिवाय मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मतदार गावी आल्याने विक्रमी मतदान झाले. विशेष म्हणजे मतदान संपल्यावर साडेपाच वाजताच ‘गुलाल आमचाच...’ असे अनेक नेते, उमेदवार आणि समर्थकांचे स्टेटस झळकले. मात्र, निकालाची घालमेल आणि चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कायम दिसली. किरकोळ कुरबुरी वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. नगरसूल, जळगाव नेऊर, अंदरसूल, खिर्डीसाठे, सत्यगाव, सायगाव आदी गावात शाब्दीक कुरकुरी ऐकायला मिळाल्या. गुरुवारी (ता.१४) रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीदर्शन झाल्याने सकाळीच मतदानाला रांगा लागल्या होत्या.

गावागावात मोठी आर्थिक उलाढाल

तालुक्यात ३९ हजार महिला तर ४३ हजार १६१ पुरुषांनी साडेतीनपर्यंत मतदानाचा हक्क बजावत ७२ टक्के मतदान केले. सायगांव येथे वॉर्ड क्रमांक एकमध्ये ३७५ मतदान झाल्यानंतर बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. तंत्रज्ञ आल्यानंतर दुसरे संपूर्ण नवीन मशिन जोडून मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. यामुळे काहीसा गोंधळ उडाला. यावेळी मताची फुली हजार ते पाच हजारावर पोहोचल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाली. शिवाय दारूचा देखील प्रचंड प्रमाणात पुरवठा झाल्याचे चित्र गावोगावी होते. काही गावात तर सोन्याचे मणी देखील वाटप झाल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

स्थलांतरित पाहुणे निवडणुकीसाठी गावात

वाड्या-वस्त्यांवर असलेल्या मतदारांना आणण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे नात्या-गोत्याच्या राजकारणात एका एका मताचा हा जुगार असल्याने प्रत्येक उमेदवाराने बाहेरगावी जाऊन स्थलांतरित मतदारांच्या भेटी घेतल्या होत्या. नातेवाईकच रिंगणात असल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पाहुणे निवडणुकीसाठी गावात आलेले दिसले. अर्थात यासाठी डिझेल पाण्याची देखील सोय करण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला असून, निकालाचा गुंताही त्याने वाढणार आहे. विशेष म्हणजे मतदान करायला येणाऱ्या मतदारांनी केंद्राबाहेर हात जोडून उभ्या असलेल्या दोन्ही पॅनलच्या नेत्यांना, भाऊ मी तुमचेच...अशी साद घातल्याने अंदाज लावणे कठीण झाले असले तरी उमेदवार मात्र विजय आपलाच या आविर्भावात सायंकाळनंतर बोलत होते. किंबहुना अनेकांच्या व्हाट्सॲप स्टेटसवर देखील गुलाल आपलाच हा दावा चमकला. 

गावात झालेल्या मतदानाटी टक्केवारी अशी

सकाळी साडेनऊपर्यंत मुरमी येथे सर्वाधिक २८ टक्के, पन्हाळसाठे येथे १८ टक्के, देवठाण येथे २२ तर सर्वात कमी ३ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर हा टक्का वाढत गेला. साडेतीनपर्यंत आडगाव रेपाळ येथे ८८ टक्के, विसापूर : ८१ टक्के, बाभूळगाव : ८० टक्के, वाघाळे : ८७ टक्के, कोटमगाव, सातारे येथे ८३ टक्के, पूरणगाव : ८६ टक्के, मुरमी : सर्वाधिक ९४ टक्के, अंगणगाव : ८० टक्के, विखरणी : ८४ टक्के, नगरसूल : ६६ टक्के, पाटोदा : ५८.६८ टक्के, राजापूर : ७३.४५ टक्के, मुखेड : ६३.६७ टक्के, पिंपळखुटे बुद्रुक : ८८ टक्के, ठाणगाव येथे ८५ टक्के मतदान झाले होते. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

स्थलांतरीत, पाहुणे मतदारही पोहोचल्याने गावोगावी वाढला टक्का ​

अनेकांनी तर मतदानानंतर वॉर्डाची आकडेमोड करून मी कसा विजयी होणार, हेही पटवून देत आजच मनात पेढे खायला सुरुवात केली आहे. 
आजारी, वयोवृद्ध, अपंग मतदारांना आणण्यासाठी उमेदवार समर्थकांची दिवसभर धावपळ सुरु होती. ज्यांना केंद्रात प्रवेश करणे अशक्य आहे, तेथे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कोळम येथे ऑक्सिजन लावलेल्या महिलेला मतदानासाठी वाहनातून आणण्यात आले. तर अनेक ठिकाणी ज्येष्ठांना खांद्यावर उचलून मतदानासाठी आणण्यात आले. विशेषतः यावेळी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिकसह इतर राज्यातील नोकरदार तसेच रोजगारासाठी स्थलांतरीत मतदार मतदानासाठी आल्याने मतदानाचा टक्का वाढला. मतदारांपर्यंत पोहोचलेली रसद, योग्य नियोजन, वाहनांची सुविधा अन्‌ शेवटच्या मिनिटापर्यंत मतदान राहिलेल्यांना आणण्यासाठी केलेली व्यवस्था यामुळे अनेक ग्रामपंचायतीत ९० ते ९५ टक्क्यांवर मतदान पोहोचले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voting process in Yeola taluka got a good response everywhere nashik marathi news