गावांना थेट नव्या वर्षातच लाभणार कारभारी! जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायती वेटिंगवर

संतोष विंचू
Saturday, 24 October 2020

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील प्रक्रिया स्थगित आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अहवाल मागितले असून, ही निवडणूकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक : (येवला) जिल्ह्यातील तब्बल ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन यंदा नवे कारभारी लाभणार होते. मात्र, लॉकडाउनमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता पुन्हा निवडणुकांचा फड रंगणार असून, जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा उर्वरित कार्यक्रम जाहीर झाला आहे. असे असले तरी या निवडणुका नव्या वर्षातच होणार आहेत. 

१०२ ठिकाणी प्रतीक्षा

यंदा एप्रिल ते जूनमध्ये मुदत संपलेल्या राज्यातील एक हजार ५७०, तर जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यात, जिल्ह्यातील कळवणमधील २९, येवल्यातील २५, दिंडोरीतील ४४, इगतपुरीतील चार अशा १०२ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ठिकाणी ३१ मार्चला मतदान आणि १ एप्रिलला मतमोजणी होणार होती. मात्र ६ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर, अर्ज छाननीच्या टप्प्यावर असताना निवडणूक आयोगाने १७ मार्चला निवडणुकांना स्थगिती दिली. त्याचवेळी राज्यातील जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या १२ हजार व जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही १७ मार्चपासून स्थगित करण्यात आला आहे. 

५१९ गावांत प्रभाग रचनेला सुरवात 

आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला अंतिम करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभागरचना व आरक्षणाला २७ ऑक्टोबरला मान्यता देतील. अंतिम प्रभाग रचना २ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये ३७, ऑगस्टमध्ये ४५९, सप्टेंबरमध्ये २, ऑक्टोबरमध्ये १०, नोव्हेंबरमध्ये एक व डिसेंबरमध्ये दहा अशा ५१९ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, त्याची प्रभागरचना आता होणार आहे. 

१०२ ग्रामपंचायतींना प्रतीक्षा 

दुसरीकडे एप्रिल ते जुलैमध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील प्रक्रिया स्थगित आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अहवाल मागितले असून, ही निवडणूकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा फड जिल्ह्यात रंगू शकतो. मात्र, ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळताना नवीन वर्ष सुरू होणार हेही वास्तव आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 

* बागलाण- ४० 
* चांदवड- ५३ 
* देवळा- ११ 
* येवला- ४४ 
* नाशिक- २५ 
* नांदगाव- ५९ 
* मालेगाव- ९९ 
* इगतपुरी- ४ 
* दिंडोरी- १६ 
* त्र्यंबकेश्‍वर- ३ 
* सिन्नर- १०० 
* निफाड- ६६ 
** एकूण- ५१९  

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for 600 Gram Panchayat Sarpanchs the district nashik marathi news