
नाशिक : राज्यातील टोलची दरवाढ मागे घेत विविध माध्यमांतून होणारी वाहतूक उद्योगाची लूट थांबवावी, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केली. तसेच वाहतूक व्यावसायिकांना दिलासा न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेतर्फे याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
टोल दरवाढ मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू
जागतिक मंदीतून सावरत असताना परत पुढे आलेल्या कोरोनाच्या भीषण संकटामुळे देशभरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततची इंधन दरवाढ, विम्याच्या रकमेत होत असलेली वाढ, टायर, ऑइल, सुट्या भागांच्या किमतीत मोठी वाढ या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यात रस्त्यावरील असुविधा, पोलिसांकडून होणारी अनधिकृत लूट आणि पुन्हा टोल दरवाढ यामुळे वाहतूक व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. गुरुवारपासून राज्यातील विविध टोलमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे वाहतूकदार आणखी अडचणीत सापडले आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घातलेल्या निर्बंधांचे पालन टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांकडून होत नाही. भरमसाट टोल भरणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध होत नाही, अशी भूमिका संघटनेने निवेदनात मांडली आहे.
हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी
समस्यांचा ससेमिरा
टोल वसूल करण्यात येत असलेल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महामार्गावर वाहन नादुरुस्त झाल्यानंतर क्रेन व्यवस्था उपलब्ध नाही. रस्ते अपघातात वाहतूकदारांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच टोल प्लाझा परिसरात चालकांसाठी स्वच्छतेच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. टोल वसूल करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या फास्टॅगमध्ये अनेक दोष असून, अनेकदा दोनदा पैसे कपात यातून होत आहे. टोलनाक्यावर वाहनचालकांना अरेरावीची भाषा वापरून त्यांना कारण नसताना मारहाण केल्याचा घटना घडत आहेत. याबाबत अनेकदा पाठपुरावा करून प्रशासनाकडून कुठलेही लक्ष घातले जात नाही. तसेच ई-वे बिल प्रणालीमधील त्रुटींमुळे वाहतूकदारांना जबाबदार धरले जाते. वेळमर्यादा कमी केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यातून चालकांची मोठी लूट केली जात आहे. परिवहन विभागाकडून सतत बदलणारी नियमावली व आकारला जाणारा अवाजवी दंड यामुळे वाहतूक व्यावसायिक अधिक अडचणीत सापडला आहे, अशी खंत वाहतूकदारांच्या संघटनेची आहे.
चालकांना लक्ष्य करून पोलिसांकडून लूट होत आहे. त्याबाबत कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न वाहतूकदारांपुढे उभा ठाकला आहे. प्रशासन झोपेचे सोंग घेतेय का, असा प्रश्न तयार झाला आहे. सरकार टोलचालकांच्या धार्जिण्यांचे कसे, याचे कोडे उलगडत नाही.
-राजेंद्र फड आणि पी. एम. सैनी, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्स्पोर्ट असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.