esakal | पथदर्शी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला घरघर! कंपनीकडून गुंडाळण्याची तयारी; महापालिकेला नोटीस,
sakal

बोलून बातमी शोधा

teachers grant.jpg

संपूर्ण राज्यात पथदर्शी ठरलेला किंबहुना स्वच्छ भारत अभियानात गुणांकन वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेला महापालिकेचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प गुंडाळण्यासाठी कंपनीने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

पथदर्शी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला घरघर! कंपनीकडून गुंडाळण्याची तयारी; महापालिकेला नोटीस,

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : संपूर्ण राज्यात पथदर्शी ठरलेला किंबहुना स्वच्छ भारत अभियानात गुणांकन वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेला महापालिकेचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प गुंडाळण्यासाठी कंपनीने महापालिकेला नोटीस बजावली आहे. उपलब्ध होत नसलेले हॉटेल वेस्ट, महापालिकेची अडवणुकीची भूमिका आदी कारणांमुळे प्रकल्प चालविणे परवडत नसल्याचे कारण दिले आहे. कंपनीच्या नोटीसमुळे हादरलेल्या महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने निर्माण झालेल्या समस्येला उत्तर देण्यासाठी कायदेशीर लढाईची तयारी केली आहे. 

पथदर्शी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला घरघर!
जर्मन सरकारच्या जीआयझेड कंपनीच्या सहकार्याने महापालिकेने विल्होळी येथे ३० टन क्षमतेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पातून प्रतिदिन ३,३०० युनिट वीज तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. मे. ग्रीन ॲन्ड क्लीन प्रा. लि. बेंगळुरू व मे. रामकी एनव्हायरो प्रा. लि. कंपनीच्या भागीदारीत प्रकल्प चालविला जात आहे. त्यासाठी मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम प्रा. लि. नावाने कंपनी स्थापन केली आहे. २०१७ पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आजपावेतो एकदाही प्रतिदिन ३,३०० युनिट वीज तयार झाली नाही. त्यामुळे प्रकल्प चालविण्यास कंपनीने असमर्थता दर्शविली आहे, तर महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी कंपनीने केली असून, त्यासंदर्भात महापालिकेला नोटीस पाठविली आहे. 

प्रकल्प गुंडाळण्याची महत्त्वाची कारणे 
- २० टन हॉटेल वेस्ट व दहा टन मलजल उपलब्ध होत नाही 
- प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भातील देयके वेळेवर मिळत नाहीत 
- ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स देयके मिळत नाहीत 
- प्रकल्पासाठी स्वतंत्र अभियंत्याची नेमणूक नाही 
- अटी व शर्तीनुसार दरवाढ नाही 
- प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला महापालिकेने दिला नाही 
- समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेकडून सहकार्य नाही 
- प्रकल्प उभारणीचे व दैनंदिन देखभालीचे देयके महापालिकेकडून मिळाले नाही 

महापालिकेने मागविला कायदेशीर सल्ला 
मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम प्रा. लि. या एसपीव्ही कंपनीमध्ये मे. ग्रीन ॲन्ड क्लीन प्रा. लि. बेंगळुरू व मे. रामकी एनव्हायरो प्रा. लि. हैदराबाद या कंपन्यांची भागीदारी आहे. मे. रामकी एन्व्हायरो इंजिनिअर्स लि. हैदराबाद या कंपनीने वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात २६ टक्के सहभाग असला, तरी तो सहभाग मे. ग्रीन ॲन्ड क्लीन प्रा. लि. कंपनीकडून घेतल्याचा दावा करताना महापालिकेशी संबंध नसल्याची नोटीस महापालिकेला दिली आहे. त्यामुळे नोटीसला उत्तर देण्यासाठी महापालिकेने कायदेशीर सल्ला मागविला आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

महापालिकेचा पथदर्शी प्रकल्प 
देशातील वाढत्या शहरांमध्ये नाशिक अग्रस्थानी असल्याने जर्मन सरकारने वेस्टपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी नाशिकची निवड केली. हा प्रकल्प राज्यभरात पथदर्शी ठरला आहे. प्रकल्प पाहणीसाठी देशभरातून महापालिकांचे प्रतिनिधी येतात. मात्र, महापालिकेच्या अनास्थेमुळे प्रकल्पाला घरघर लागली आहे. हा प्रकल्प नाशिकमधून हलविल्यास नाचक्कीला सामोरे जावे लागणार आहे. 

करारानुसार प्रकल्प बंद करता येत नाही. कंपनीने पाठविलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन मागविले असून, प्रकल्प बंद होणार नाही यासाठी यांत्रिकी विभागाचे प्रयत्न आहेत. 
-शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग