वाढीव पाण्याला जलसंपदा विभागाची आडकाठी! महापालिकेला तांत्रिक बाबीत अडकविण्याचा प्रयत्न

nashik-nmc_201909294551.jpg
nashik-nmc_201909294551.jpg

नाशिक : शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाचशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाला त्याप्रमाणे सूचना दिल्या. जलसंपदा विभागाने तूर्त होकार दिला. परंतु प्रत्यक्षात पाणी देण्याची वेळ आली, त्यावेळी दोन टीएमसी पाण्याची तूट दाखवत अतिरिक्त पाण्याची मागणी कशाच्या आधारे नोंदविली, याची आकडेवारी मागवून तांत्रिक बाबीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने नाशिककरांना वाढीव पाणी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. 

छगन भुजबळांकडून जलसंपदा विभागाला सूचना 

नाशिक शहराला गंगापूर धरणसमूह, मुकणे व दारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात दर वर्षी पाण्याची मागणीही वाढते. गेल्या वर्षी गंगापूरसमूह (३६००), मुकणे (१०००) तर दारणा धरणात (४००) दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवले होते. परंतु वाढत्या लोकसंख्येला ते पुरेसे नसल्याने धरणांतून अतिरिक्त पाणी उचलण्यात आले. एकूण पाच हजार दशलक्ष घनफुटाव्यतिरिक्त २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणीपुरवठा शहरासाठी झाला. यंदा पाचशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदवली गेली. गंगापूर समूह (३८००) मुकणे (१३००) दारणा (४००) दशलक्ष घनफूट मागणीला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मान्यता देत जलसंपदा विभागाला तशा सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, जलसंपदा विभागाने होकार दिल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला होता. 

दोन टीएमसी पाण्याची तूट कशी? 

परंतु प्रत्यक्षात कागदावर वाढीव पाणी आरक्षण देण्याची वेळ आली, त्या वेळी जलसंपदा विभागाने काश्‍यपी, गौतमी गोदावरी धरणात गेल्या वर्षी एक टीएमसी, तर मुकणे धरणात एक असे दोन टीएमसी पाण्याची तूट असल्याचे कारण देत वाढीव पाणी देण्यास नकार दर्शविण्याची तयारी दाखविली आहे. पाणी देण्यास थेट नकार कळविता येत नसल्याने लोकसंख्या, संस्थात्मक पाणीवापर, पाणीगळती आदींची माहिती मागवून आडकाठी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने नाशिककरांना वाढीव पाणी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. 

पुनर्वापराचा हिशेब 

शहरात रोज ५०० ते ५१५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यातील ६० टक्के पाणी मलजलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून त्यावर प्रक्रियेनंतर तेच शुद्ध पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. त्यानंतर ते पाणी विविध संस्था उचलतात. याचाच अर्थ त्या पाण्याचा (पुनर्वापर) उपयोग होतो. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून दोन टीएमसी पाण्याची तूट असल्याचे सांगितले जात असलेले कारण चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ अभियंत्यांकडून व्यक्त केले जात आहे. 

गंगापूर व मुकणे धरणसमूहात दोन टीएमसी पाण्याची तूट आहेच; पण जेवढी पाण्याची मागणी नोंदविण्यात आली त्यानुसार पाणी देण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे. - अलका वाघ, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com