‘कसमादे’तील टरबूज मातीमोल; दिल्लीच्या बाजार बंदचा शेतकऱ्यांना फटका

गोकुळ खैरनार
Tuesday, 5 January 2021

कसमादेतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी फळशेती फुलविली आहे. दिवाळीनंतर आंतरपिकात हिवाळी टरबूज घेण्याचा प्रयोग काहीअंशी यशस्वी झाला असला, तरी दिल्ली मार्केट बंद असल्याचा फटका टरबुजाला बसला आहे.

मालेगाव (जि. नाशिक) : कसमादेतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी फळशेती फुलविली आहे. दिवाळीनंतर आंतरपिकात हिवाळी टरबूज घेण्याचा प्रयोग काहीअंशी यशस्वी झाला असला, तरी दिल्ली मार्केट बंद असल्याचा फटका टरबुजाला बसला आहे. सध्या टरबुजाला केवळ तीन ते चार रुपये किलोचा दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीचा प्रमुख बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत टरबूज विकावे लागत आहे. 

मुंबई, सुरत व दिल्ली या प्रमुख बाजारपेठांमध्ये टरबूज पाठविला जातो. उत्तर भारतात लग्नसोहळ्यांमध्ये फळांबरोबर ज्यूससाठी टरबुजाचा वापर केला जातो. 

महिनाभर उशिरा पीक

कसमादेसह नाशिक जिल्ह्यात हिवाळ्यात टरबूज फारसे खात नाहीत. या भागात फेब्रुवारी ते मेदरम्यान टरबुजाला पसंती दिली जाते. दोन वर्षांपासून मुबलक पाणी असल्यामुळे शेतकरी डाळिंब, पपई, मिरची, शेवगा आदी पिकांमध्ये हिवाळी टरबुजाचे आंतरपीक घेत आहेत. उन्हाळी टरबुजापेक्षा हिवाळी टरबुजाचे उत्पन्न कमी घेतले जाते. दिल्ली व उत्तर भारतातील लग्नसोहळ्यांमध्ये हिवाळ्यातदेखील टरबुजाची चव चाखली जाते. त्यामुळे हे पीक फायदेशीर ठरते. साधारणत: सप्टेंबरमध्ये त्याची लागवड केली जाते. दिवाळी संपताच माल बाजारात येतो. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे लागवड ऑक्टोबरमध्ये झाली. परिणामी महिनाभर उशिरा पीक आले. 
दिल्ली बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक, तसेच इतर बाजारपेठांमध्ये माल विकावा लागत आहे.

तीन ते चार रुपये किलोने मालाची विक्री

साधारणत: पाच रुपये किलोने विक्री झाल्यास खर्च निघतो. शेतकऱ्यांना किमान सात ते आठ रुपये किलोची अपेक्षा होती. तीन ते चार रुपये किलोने मालाची विक्री होत असल्याने खर्चदेखील निघत नाही. त्यातच डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. सध्याच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे मालाला उठाव नसल्याने टरबुजांची मागणी घटली आहे. एरवी ऑक्टोबरपर्यंत टरबूज विकले जातात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टरबुजाचे घाऊक भाव १५ ते १७ रुपये किलोपर्यंत गेले होते. सद्यःस्थितीत मुबलक पाणी असल्याने उन्हाळी टरबूज लागवड वाढणार आहे. त्यामुळे कसमादेसह खानदेशवासीयांना लालेलाल टरबुजाची चव मुबलक प्रमाणात चाखता येईल. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

दिल्ली बाजार बंद असल्याने टरबुजाचे घाऊक भाव कोसळले. त्यातच डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक खर्च वाढला. आम्ही पाच एकरांवर आंतरपीक म्हणून हिवाळी टरबूज लावला होता. तीन लाख रुपये खर्च आला. उत्पन्न जेमतेम दीड लाखापर्यंत होईल. बदललेल्या वातावरणाचा पिकाला फटका बसला. 
-दिलीप जाधव, शेतकरी, रावळगाव 

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watermelon farmers getting very low prices due to closure of Delhi market nashik marathi news