आशादायी! आत्मनिर्भरतेकडे 'त्यांची' वाटचाल...बेरोजगारांनाही मिळतोय हक्काचा रोजगार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

विविध उद्योग, व्यवसाय व सेवा पुरवून अनेकजण आर्थिक सक्षम होऊन आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहेत. यासाठी विविध प्रकारच्या युक्‍त्या वापरल्या जात असून त्या इतरांनाही आत्मनिर्भरतेसाठी प्रेरणा देतात. यामुळेच रोजगारासाठी कायम भटकंती करणाऱ्या आदिवासी समाजासही हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याने ते आत्मनिर्भर होत आहेत. ते कसे एकदा वाचाच... 

नाशिक / येवला : विविध उद्योग, व्यवसाय व सेवा पुरवून अनेकजण आर्थिक सक्षम होऊन आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहेत. यासाठी विविध प्रकारच्या युक्‍त्या वापरल्या जात असून त्या इतरांनाही आत्मनिर्भर तेसाठी प्रेरणा देतात. यामुळेच रोजगारासाठी कायम भटकंती करणाऱ्या आदिवासी समाजासही हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याने ते आत्मनिर्भर होत आहेत. ते कसे एकदा वाचाच...

वीटभट्टी अन ऊसतोडीला सुट्टी 

यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे येवला तालुक्‍यात पाझर तलाव भरले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील ममदापूर, देवदरी, कोळगाव, खरवंडी, अंगुलगाव आदी गावांतील दहा पाझर तलावांत तब्बल 4 लाख 80 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. या मत्स्यबीजांच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्‍यातील दीडशेहून अधिक बेरोजगार युवकांना रोजगार हक्काचा रोजगार मिळत आहे. यामुळे पाच वर्षांपासून आदिवासी बांधवांचे वीटभट्टी किंवा ऊस तोडीसाठी बाहेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. 

मुलांचे शिक्षण आता गावातच 

अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळाल्याने मुलांचे शिक्षण गावातच होऊ लागले आहे. या व्यवसायात अधिकाधिक तरुण सहभागी होऊन आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत आहेत. मच्छी व्यवसायामुळे त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातली हे तरुण आता मासे पकडण्यापासून ते विक्रीपर्यंत सहभाग घेत असल्याने अनेक कुटुंबाचा आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्‍यात ताजा मासा मिळाल्यामुळे मागणीही दरवर्षी चांगल्याप्रकारे वाढत आहे. 

शेततळ्यातही जोडधंद्याची संधी 

प्रत्येक वर्षी पाझर तलावांमध्ये मत्स्यबीज टाकण्यात येते. यंदा तर विक्रमी बीज सोडल्याने या बांधवांना चांगला रोजगार प्राप्त होणार आहे. आदिवासी बांधवाबरोबर इतरांनी मत्स्यव्यवसाय केल्यास चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो. तालुक्‍यामध्ये मोठ्या संख्येने शेततळे आहेत. शेततळ्यातही शेतकरी बांधव आपल्या जमिनीला जोडधंदा म्हणून मच्छी व्यवसाय करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना शेततळ्यात होणारी घाण शेवाळ हे सर्व माशांचे खाद्य असल्यामुळे शेततळ्यात होणारे घाण रोखून शेतकऱ्याला दुहेरी फायदा होईल. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

हैदराबादहून आणले बीज 

येवला तालुक्‍याच्या पुर्व भागात पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी गेल्या 5 वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्‍यातल्या आदिवासी बांधवांच्या या उपक्रमाला तरुण प्रतिसाद देत असल्याने तसेच पाणीही चांगले असल्याने बीज सोडण्यात आले. आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबण्यासाठी गायकवाड यांनी पावले उचलली आहेत. पूर्व भागातील आदिवासी बांधवांकडून हे बीज हैदराबाद येथून उपलब्ध केले असून गायकवाड यांच्या हस्ते देवदरी येथे मत्स्यबीज सोडण्यात आले.

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The way for the tribal community to become self-reliant in yeola nashik marathi news