बाजारात गव्हाचे भाव कोसळले! कोरोनामुळे मोफत धान्य मिळत असल्याचा परिणाम

gevu.jpg
gevu.jpg

मालेगाव (नाशिक) : कोरोनामुळे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांतून महिन्यातून दोन वेळा धान्यपुरवठा होत आहे. एकदा मोफत, तर दुसऱ्यांदा अल्पदरात गहू व तांदूळ मिळत आहेत. सात महिन्यांपासून मिळणाऱ्या या धान्यामुळे अनेकांच्या घरात ५० किलोपेक्षा अधिक धान्यसाठा झाला आहे. परिणामी, खुल्या बाजारातील धान्याचे भाव घसरले आहेत. 

खुल्या बाजारात गव्हाची मागणी घटली

गहू एक हजार ५०० ते एक हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. बाजरीचे दरही एक हजार २०० ते एक हजार ४०० रुपयांदरम्यान आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेने गहू व बाजरी या दोन्ही पिकांना ५०० ते ७०० रुपयांचा फटका बसला आहे. ऐन सणासुदीतही बाजारात गव्हाला मागणी दिसून येत नाही. कोरोनामुळे लॉकडाउन काळात एप्रिलपासून मोफत धान्य योजना सुरू झाली. सात महिन्यांपासून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांतून मोफत व कमी किमतीतील नियमित धान्य मिळत आहे. हजारो कुटुंबीयांकडे गहू, तांदूळ शिल्लक आहेत. परिणामी, खुल्या बाजारात गव्हाची मागणी एकदमच घटली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास गव्हाला दोन हजार ते दोन हजार ४०० रुपयांपर्यंत भाव होता. यंदा तो एक हजार ५०० ते एक हजार ८०० रुपयांदरम्यान आहे. चांगल्या प्रतिच्या गव्हाला अपवादात्मक दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. 

गव्हाचे भाव नव्या वर्षातच वाढण्याची शक्यता

किरकोळ खरेदीसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत असले तरी घाऊक बाजारात शेतकऱ्यांचा गहू घसरला आहे. हीच परिस्थिती बाजरीची आहे. गेल्या वर्षी दोन हजार ४०० रुपये क्विंटलपर्यंत बाजरीचे भाव गेले होते. सध्या उत्तम प्रतिची बाजरी एक हजार ५०० ते एक हजार ६०० रुपये क्विंटलने विकली जात आहे. दसरा-दिवाळी सणासाठी शेतकरी धान्याची विक्री करतात. आगामी रब्बी हंगामातही गव्हाचे मुबलक उत्पन्न घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राखून ठेवलेला गहू शेतकरी बाजारात आणत आहेत. मोफत धान्य योजनेचा फटका गव्हाला बसला असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. गव्हाचे भाव नव्या वर्षातच वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

स्वस्त धान्य दुकानात 
प्रतिमाह मिळणारे धान्य 

मोफत (प्रतिव्यक्ती) 
गहू - तीन किलो 
तांदूळ - दोन किलो 
हरभरा डाळ - दोन किलो 

नियमित मिळणारे धान्य 

प्राधान्य कुटुंब 
गहू- तीन किलो (दोन रुपये किलो) 
तांदूळ - दोन किलो (तीन रुपये किलो) 
 
अंत्योदय लाभार्थी (प्रतिकुटुंब) 

गहू - २६ किलो (दोन रुपये किलो) 
तांदूळ - नऊ किलो (तीन रुपये किलो) 
साखर - एक किलो (२० रुपये किलो) 

शासनाने बाजरीला दोन हजार १५० रुपये किमान आधारभूत किंमत ठरविली आहे. प्रत्यक्षात या किमतीपेक्षा ७०० ते ८०० रुपये कमी दराने बाजरी विकावी लागत आहे. शासनाने अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलने गहू खरेदी करावा. सध्या गव्हाला मिळत असलेल्या किमतीतून खर्चही निघणे अशक्य आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव फक्त कागदावरच राहतात. - दिलीप जाधव, शेतकरी, रावळगाव 

स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य मिळत असल्याने गव्हाचा उठाव कमी आहे. त्याचा परिणाम खरेदी-विक्रीवर होऊन भाव कमी झाले. मागणी वाढल्यास भाव वाढू शकतील. पुढच्या वर्षीदेखील गव्हाचे उत्पन्न वाढणार आहे. भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. - भिका कोतकर, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन मालेगाव

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com