"इस गॉंव में आदमी रहते या चिडिया?" का होतोय मालेगावात कोरोनाचा भयावह उद्रेक?

malegaon 1.png
malegaon 1.png

मालेगाव : "इस गॉंव में आदमी रहते या चिडिया?' असे दिवंगत केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहमद सईद यांनी साधारणतः 20 वर्षांपूर्वी मालेगाव दौऱ्यात विचारले होते. त्या वाक्‍याची प्रचीती आजही येते. कोरोना विषाणू संसर्गाचा जो भयावह उद्रेक या यंत्रमागाच्या शहरात झाला तोदेखील गर्दीने श्‍वास कोंडला गेल्यामुळेच. 

कोरोनाचा नेमका दाट लोकवस्तीवरच हल्लाबोल
मालेगाव महापालिकेचे क्षेत्रफळ 68.5 चौरस किलोमीटर असले तरी प्रचंड गर्दीचा 12.95 चौरस किलोमीटरचा मध्यभाग हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट आहे. या परिघात जवळपास सात लाख लोकसंख्या सामावली आहे. ही घनता तब्बल 53 हजार 840 इतकी येते. तब्बल 134 झोपडपट्ट्यांच्या विळख्यात अडकलेल्या मालेगावचा माणसांच्या गर्दीने श्‍वासच कोंडला गेला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या शहरांपैकी एक व देशाची आर्थिक राजधानी मुंबईची घनता साधारणपणे 45 हजार आहे. त्यापेक्षा अधिक घनतेचे मालेगाव कदाचित याबाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असेल. कोरोनाने नेमका दाट लोकवस्तीवरच हल्लाबोल केल्यामुळे येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेरा जणांचे जीव या महामारीत गेले आहेत. 

दाट लोकवस्तीचे शहर 
मालेगाव हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. कष्टकरी मजुरांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. शहरात यंत्रमाग हा प्रमुख व्यवसाय आहे. यंत्रमाग व पाइप करखान्यावरच येथील मजुरांचा उदरनिर्वाह चालतो. मर्यादित गरजांवर समाधान मानून येथील लाखो नागरिक पत्रे व फळ्यांच्या घरात राहून समाधान मानीत आहेत. त्यातच अज्ञान, अशिक्षितपणा येथील नागरिकांना दारिद्य्ररेषेच्या बाहेर पडू देत नाही. 

54 हजार नागरिक राहतात एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 
शहराची 2011 च्या जगणनेनुसार चार लाख 65 हजार लोकसंख्या आहे. 12.95 म्हणजे जवळपास 13 किलोमीटरच्या परिघात ही लोकसंख्या राहते. हद्दवाढीनंतर मालेगाव 60 किलोमीटरमध्ये विस्तारले. मात्र मूळच्या 13 किलोमीटरमधील लोकसंख्या दहा वर्षांत तीन लाखांपेक्षा अधिक वाढली आहे. महापालिका हद्दीतील लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. हद्दवाढ सोडून मूळच्या 13 किलोमीटरमध्ये जवळपास सात लाख नागरिक राहतात. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 53 हजार 840 नागरिक राहत आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या दोन लाख 95 हजार आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या भागाची लोकसंख्या सहा लाखांपर्यंत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. ही लोकसंख्या जरी मानली तरी एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये 46 हजार नागरिक राहतात. मुंबईत हीच संख्या 28 हजार आहे. इतर शहरांच्या तुलनेने येथे दुप्पट व तिपटीने नागरिक राहत आहेत. साधारणतः एक स्क्वेअर किलोमीटरमध्ये 20 हजार नागरिक राहणे चांगले मानले जाते. दाट लोकवस्तीच्या या भागातच कोरोनाने आपले ठाण मांडले आहे. चिमण्या-पाखरांसारखे राहत असलेल्या माणसांच्या गर्दीतून कोरोना कसा हद्दपार होईल याचे उत्तर येणारा काळच देईल. 

घरातसुद्धा शक्‍य नाही सोशल डिस्टन्स 
मालेगावचा 70 टक्के भाग झोपडपट्ट्यांच्या विळख्यात आहे. 12 बाय 15, 12 बाय 20, 15 बाय 20 अशा अंतराची येथे हजारो घरे आहेत. एवढ्याशा जागेत कुटुंबातील आठ ते दहा लोक घरात तरी सोशल डिस्टन्स कसे राखतील हा प्रश्‍न आहे. गरीब व दारिद्य्ररेषेखालील कुटुंबीयांना अशा परिस्थितीत राहण्याची सवय झाली आहे. 

वॉटर, गटर आणि मीटर याच पन्नास वर्षांच्या समस्या 
शहर झोपडपट्टीच्या विळख्यात एवढे गुरफटले आहे की नागरिकांना फक्त निवाऱ्याची सोय हवी आहे. पन्नास वर्षांपासून येथील नागरिक पाणी, गटारी व वीज या तीन प्रशांसाठीच झगडत आहेत. रस्ते, हायमास्ट, अभ्यासिका आदी गोष्टी यांच्यापासून कोसो दूर आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी झोपडपट्ट्या अतिक्रमित जागांवरच्या आहेत. येथे शासकीय जागा विकण्याचे प्रकारही अनेकदा समोर आले आहेत. पुढाऱ्यांना लाच देऊन प्लॉट घेतले म्हणून रहिवाशांनी एका झोपडपट्टीला चक्क "रिश्‍वतनगर' नाव दिले. महापालिका व इतर शासनदरबारी या भागाची नोंद रिश्‍वतनगर अशीच आहे. 

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

राजकीय नेतृत्व जबाबदार 
मालेगावची ही अवस्था होण्यास आजवरचे राजकीय नेतृत्व जबाबदार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून येथील महाळदे शिवारात 11 हजार घरकुले बांधण्यात आली आहेत. अतिक्रमित झोपडपट्ट्यांमधील नागरिक स्थलांतरित झाले, तर नागरिकांचीही सोय होईल. शिवाय अतिक्रमण दूर होऊन गर्दीचा विळखा कमी होईल. नवीन घरकुलांचा ताबा घेतानाच जुनी जागा सोडणार नाही, नव्या ठिकाणी सोयी-सुविधा नाहीत अशी कारणे पुढे करत नागरिक घरकुलांमध्ये जात नाहीत. राजकीय नेते त्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीला नागरिकांबरोबरच स्थानिक नेतेही तेवढेच जबाबदार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com